सामाजिक कार्याचा महायज्ञ धगधगता ठेवणार आहे : मेघना बोर्डीकर

सामाजिक कार्याचा महायज्ञ धगधगता ठेवणार आहे : मेघना बोर्डीकर

सेलू (जि.परभणी) : जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करत असतांना स्वच्छता मोहीम असो की, घरोघरी सुलभ शौचालय योजना असो, शैक्षणिक क्षेत्र असो की आरोग्य सेवा असो या सर्व बाबतीत मी भरीव काम केलेले आहे. सामाजिक कार्याचा हा महायज्ञ मला या विधानसभा मतदार संघाची आमदार म्हणून अधिक जोमाने धगधगता ठेवायचा असल्याचे प्रतिपादन जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या भाजप - शिवसेना महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे यांनी केले. 


जिंतूर - सेलू मतदार संघात गेल्या नऊ वर्षापासून दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, बेरोजगारांचे मेळावे, गुणवंताचा सत्कार सोहळा, महिला बचत गट, महिला आरोग्य मेळावे आदी विविध सामाजिक कार्यात सक्रिय असून जिंतूर- सेलू मतदार संघातील जनतेशी मी थेट संपर्कात आहे. त्यामुळेच महायुतीकडून म्हणजे भाजपाकडून या मतदार संघात प्रथमच महिला उमेदवार म्हणून पक्ष श्रेष्ठीनी मला संधी दिल्याचे महायुतीच्या भाजपच्या उमेदवार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. 

जिंतूर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत पार पडलेल्या बारा निवडणुकीत आठ वेळा कॉंग्रेस, तीन वेळा शेतकरी कामगार पक्ष तर राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारास नेतृत्वाची संधी मिळाली. मराठवाडा हैद्राबाद संस्थानात असतांना 1952-53 मध्ये जिंतूर मतदारसंघात विधानसभेची पहिली निवडणूक झाली. 2009मध्ये जिंतूर मतदार संघात सेलू तालुक्‍याचा समावेश झाला. या मतदारसंघातील दोन्ही तालुक्‍यात कारखाने, औद्योगिक वसाहत नसल्याकारणाने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या पाच वर्षात विरोधकाकडून विकासाची कोणतीच कामे झाली नाहीत. उलट ऍट्रॉसिटी कायद्याचा विनाकारण बाऊ करून विरोधकांनी जातीय वातावरण निर्माण करून संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही असे प्रयत्न थांबवून सर्व जाती-धर्मात एकोपा ठेवण्याचा सामुहिक प्रयत्न केला आहे. कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल व्देष न करता सर्वांना एका प्रवाहात आणण्यासाठी आगामी काळात प्रामाणिक प्रयत्न राहणार असून पक्ष नेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करून विश्वासाला पात्र राहून काम करणार आहे. माझ्या हातून कोणत्याही समाजाचे, व्यक्तीचे मन दुखावणार नाही अशी हमी मी देत आहे. आगामी काळातही निष्पक्ष,सर्वांना सोबत घेवून काम करण्याच्या भूमिकेवर ठाम राहून जनसेवा करण्याचा ध्यास घेतला आहे.असे मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. 

विकासाचे नवे पर्व सुरू करणार. 
मला या भागाची पहिली महिला लोकप्रतीनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यास आपल्या भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील राहणार. मतदार संघात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. त्याच्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य देण्याची भूमिका राहणार आहे. मुबलक विज पुरवठा, पाणी प्रश्न, गाव तेथे पक्का रस्ता या कामाबरोबरच शेतकरी, शेतमजूर, निराधार व्यक्ती यांना दैवत समजून त्यांच्या अडीअडचणी सोडवून न्याय देण्याची भूमिका राहणार आहे. येलदरी व लोअर दूधना प्रकल्प धरणाचे अर्धवट राहिलेले कालवे, नद्या,नाले, जलसाठे, पूर्नजीवित करून पाणीदार गावे करणार. सेलू येथील मंजूर असलेल्या टेक्‍सटाईल पार्कचे काम पूर्ण करणार या सारखी अनेक विकास कामे पूर्ण करून विकासाचे नवे पर्व निर्माण करण्याची प्रामाणिक भूमिका आहे असे महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार मेघना साकोरे-बोर्डीकर सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com