आठवडाभरात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? 

आठवडाभरात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? 

मुंबई : गेल्या बुधवारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील चार आमदार आणि काही पदाधिकऱ्यांची भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानंतर आणखी आठवडाभरात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत. 

येत्या 10 ऑगस्टच्या सुमारास विरोधी पक्षातील आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. 

विधानसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक नेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडे ओढा सुरू झाला आहे. यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात निराशेचे वातावरण असल्याची चर्चा असली तरी दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंद साजरा केला आहे. भाजपात गेलेले नेते सत्तापिपासू असून ते पक्षातून गेल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे दोन्ही कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. 

आता भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असून 10 ऑगस्टला कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते हाती कमळ घेणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे.

या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच पहिल्या टप्प्यानंतर 10 ऑगस्टला भाजपमध्ये आणखी काही नेते पक्षप्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आघाडीला मात्र चांगलाच धक्का बसणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये पहिल्या टप्प्यातील मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपचे कमळ हाती घेतले. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, कॉंग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

 शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश यात्रा' अमरावती जिल्ह्यातून सुरू झाली आहे. त्यामुळे युतीतील दोन्ही सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना सत्तेतील दोन्ही पक्ष विरोधी नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी सरसावले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com