"वैद्यकीय'चा मार्ग मोकळा, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशास निवडणूक आयोगाची परवानगी

 "वैद्यकीय'चा मार्ग मोकळा, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशास निवडणूक आयोगाची परवानगी

मुंबई : राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 250 मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला संरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्यास निवडणूक आयोगाने राज्य सरकारला गुरुवारी (ता. 16) परवानगी दिली आहे. उद्यापर्यंत (ता. 17) हा अध्यादेश काढला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने 250 मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आझाद मैदानात मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने सरकारचीही कोंडी झाली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला संरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती. राज्य सरकारने प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केले आहे; पण सरकारचा हा कायदा लागू होण्यापूर्वीच वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा निर्णय झाल्याने मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांसाठी 10 टक्‍के आरक्षणाचा घेतलेला निर्णय हा मराठा आरक्षणाच्या नंतरचा असतानाही वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी तो लागू झालेला होता. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांनी आक्रमक होत राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडले. 

केंद्रीय स्तरावरील या प्रवेश प्रक्रियेत अशा प्रकारचा गोंधळ उडाल्याने राज्य सरकारची कोंडी झाली होती. अखेर सरकारने अध्यादेश काढून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. 25 मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असल्याने तातडीने निवडणूक आयोगाकडे अध्यादेश काढण्याची विनंती केली होती. 

आंदोलन आज स्थगित? 
अध्यादेश काढण्यास आयोगाने सरकारला परवानगी दिल्याने उद्यापर्यंत अध्यादेश काढण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित होईल, असा विश्‍वास गिरीष महाजन यांनी व्यक्‍त केला. मराठा क्रांती मोर्चाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com