Medha Kulkarni and Muralidhar Mohol's workers fight over hording | Sarkarnama

पुणे भाजपात होर्डींग युद्ध; मेधाताई - मोहोळांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

उमेश घोंगडे 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

शहराच्या सर्वच भागात लावण्यात आलेल्या होॅर्डींग आणि फ्लेक्‍सची संख्या शेकड्यात आहे. होर्डींगची साईट आपल्यालाच मिळावी यासाठी चढाओढ असून यातून होर्डींग व्यावसायिकांवर दबाव टाकण्यात येत आहे.

पुणे : निवडणुकीचा मुहुर्त ठरायच्या आधीच भारतीय जनता पक्षांतील इच्छुकांत संघर्ष पेटला असून, कोथरूडमध्ये या संघर्षाने टोक गाठले आहे.

महाजनादेश यात्रेच्या होर्डींग लावण्याच्या कारणावरून कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी व येत्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून उमेदवारीचे दावेदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यात बुधवारी  बाचाबाची झाली . त्यानंतर कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण मतदारसंघात चर्चेचा विषय बनली आहे. 

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या रात्री झालेली हाणामारी पोलिसांपर्यंत पोचली. मात्र, महाजनादेश यात्रेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे तक्रार न देता दोन्ही बाजूंनी शांत राहणे पसंत केले.

आमदार कुलकर्णी व मोहोळ यांच्यातील मतभेद यापूर्वीही अनेकवेळा चर्चेत आले आहेत. महाजनादेश यात्रा उद्या पुण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील मेहेंदळे गॅरेज चौकात होर्डींग लावण्यावरून दोघांच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. बाचाबाची झाली. मारहाणदेखील झाली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. मात्र, यात्रेच्या निमित्ताने मुख्यंमत्री पुण्यात येणार आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

 या संदर्भात आमदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता. त्या म्हणाल्या, "आमच्यासाठी फ्लेक्‍स आणि होर्डींगपेक्षा कार्यकर्त्यांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे चूक नसतानाही आम्ही शांत आहोत. झाला प्रकार मी पक्षातील वरिष्ठांच्या कानावर घातला आहे.'' 

नगरसेवक मुरलीधर मोहोळ म्हणाले, " मेहेंदळे गॅरेज चौकातील होर्डींग मालकाच्या परवानगीने आम्ही होर्डींग लावले होते. मात्र, दमदाटी करून ते होर्डींग काढून त्यावर आमदार कुलकर्णी यांचे होर्डींग लावण्यात आले. ही दादागिरी होती. तरीही आम्ही गप्प बसलो.''

जनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी चौकाचौकात फ्लेक्‍स आणि होर्डींग लावण्यात आली आहेत. नगरसेवकांपासून आमदारीकीसाठी इच्छुकांचा यात समावेश आहे. शहराच्या सर्वच भागात लावण्यात आलेल्या होॅर्डींग आणि फ्लेक्‍सची संख्या शेकड्यात आहे. होर्डींगची साईट आपल्यालाच मिळावी यासाठी चढाओढ असून यातून होर्डींग व्यावसायिकांवर दबाव टाकण्यात येत आहे.

आमदार कुलकर्णी व मोहोळ यांच्यातील वाददेखील अशाच होर्डींगवरून झाला. उमेदवारी मिळविण्याचे मोहोळ यांचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे उमेदवारी टिकवण्याचे आमदार कुलकर्णी यांचेदेखील निकराचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच दोघांच्या कार्यकर्त्यामंध्ये वाद वाढत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख