medha kulkarni | Sarkarnama

आ. मेधा कुलकर्णींवर संभाजी ब्रिगेडची टीका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017


संभाजी उद्यानात कोणत्याही परिस्थितीत गडकरींचा पुतळा बसवू नये. तिथे संभाजी महाराजांचाच पुतळा बसवावा. गडकरींनी संभाजी महाराजांची बदनामी केल्याचे आम्ही पुराव्यासह मांडत आहोत. यासंबंधाने चर्चेची आमची तयारी आहे. लोकशाही मार्गाने 4 मे रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत.
- बी. जी. कोळसे पाटील, लोकशासन आंदोलन

पुणे : संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा नव्याने उभारण्याचा विषय दिवसेंदिवस वादग्रस्त बनत चालला आहे. यासंबंधी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून घेतली जाणारी भूमिका जातीयवादी आणि गडकरींविषयीच्या अज्ञानापोटी असल्याची टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे.

संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा तत्काळ बसवावा व राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवू नये, या मागण्यांसाठी दि. 4 मे रोजी पुणे महापालिकेला घेराव व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने होणार आहे. यासंबंधीची घोषणा लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष बी. जी. कोळसे पाटील, महात्मा फुले इतिहास अकादमीचे अध्यक्ष श्रीमंत कोकाटे यांनी केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी आ. मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली.

श्रीमंत कोकाटे म्हणाले, "गडकरींनी संभाजी महाराजांची प्रचंड बदनामी केली आहे. त्यामुळे संभाजी उद्यानात कोणत्याही परिस्थितीत गडकरींचा पुतळा बसवू नये. तसा प्रयत्न केल्यास शिवशंभूंना मानणारी महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही. मेधा कुलकर्णींना गडकरींचा पुतळा बसवायचा असेलतर तर त्यांनी नरेंद्र मोदींना आणून एखाद्या नाट्यगृहात बसवावा.' संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा बसवा, असा ठराव करणारे नगरसेवक, तसेच कलावंतांनी गडकरींचे संभाजी महाराजांविषयीचे लिखाण वाचले तर त्यांची मते बदलतील, असा दावाही कोकाटे यांनी केला.

या आंदोलनाला मराठा सेवा संघ, मराठा महासभा, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड, शिवराज्य प्रतिष्ठान, सत्यशोधक क्रांती दल, छावा, राष्ट्र सेवासमूह, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, शिवप्रेमी जनजागरण समिती, पुरोगामी युवक संघर्ष समिती, रौद्रशंभू प्रतिष्ठान, दिव्यांग संघटना, निर्भयनारी फाउंडेशन, शिवधर्म ग्रंथालय, आदी संघटनांनी पाठिंबा दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख