योगेश सागर... कामामुळे सातत्यानं जनाधार वाढलेला नेता

अभ्यास न करणाऱ्या मुलाला परिक्षेची भीती वाटते. जो लोकप्रतिनिधी पाच वर्षे लोकांशी संपर्क ठेवतो, त्यांची कामे करतो, त्यासाठी मेहनत घेतो, तो विजयी होतोच. लोकांना आपली आवश्यक्यता असते तेवढाच वेळ ते आपल्याला पदावर ठेवतात. त्यामुळे लोक ठेवतील तेवढा काळ पदावर लोकांसाठी काम करीत रहायचे, असे सांगत आहेत, साताऱ्यापासून ते अकोल्यापर्यंत जलयुक्त शिवार, शेततळी आदी कामे केलेले मुंबईतील चारकोपचे भाजप आमदार योगेश सागर.
योगेश सागर... कामामुळे सातत्यानं जनाधार वाढलेला नेता
yogesh sagar gets more public support due to works

अभ्यास न करणाऱ्या मुलाला परिक्षेची भीती वाटते. जो लोकप्रतिनिधी पाच वर्षे लोकांशी संपर्क ठेवतो, त्यांची कामे करतो, त्यासाठी मेहनत घेतो, तो विजयी होतोच. लोकांना आपली आवश्यक्यता असते तेवढाच वेळ ते आपल्याला पदावर ठेवतात. त्यामुळे लोक ठेवतील तेवढा काळ पदावर लोकांसाठी काम करीत रहायचे, असे सांगत आहेत, साताऱ्यापासून ते अकोल्यापर्यंत जलयुक्त शिवार, शेततळी आदी कामे केलेले मुंबईतील चारकोपचे भाजप आमदार योगेश सागर.

मी पहिल्यापासूनच संघपरिवाराशी जोडला गेलो होतो, तेथे मी सक्रीय होतो. राम नाईक यांच्या पहिल्या निवडणुकीच्यावेळी संघाच्या वरिष्ठांनी आणि भाजपच्या नेत्यांनी मला संघटनात्मक कामांसाठी भाजपमध्ये बोलावले. त्यावेळपासून म्हणजे 1989 पासून मी पक्षकामात सक्रीय झालो. आधी पक्षात कोणतेही पद मिळण्याचा विचारही माझ्या मनात आला नाही, संघात असताना तर पदांचा काही प्रश्नच नव्हता. मात्र हळुहळू माझे काम पाहून वॉर्डाचा महामंत्री, विभागप्रमुख, जिल्हाध्यक्ष अशी पदे मिळत गेली. 

जनसंपर्क व लोकांची कामे केल्याने तीनदा नगरसेवक, तीनवेळा आमदार, मागील टर्ममध्ये मंत्रीपद अशी पदे मिळाली. 

सन 2000 च्या सुमारास चारकोप विभाग काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तेव्हा पक्षाने नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीत मला उमेदवारी दिली. तेव्हा मी जेमतेम साडेसहाशे मतांनी निवडून आलो. पण त्यानंतर मी कामाचा झपाटा वाढवला व 2002 च्या निवडणुकीत अडतीसशे मतांनी व 2007 च्या निवडणुकीत आठ हजार मतांनी विजयी झालो. त्यानंतर 2009 च्या पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीच्यावेळी मी नगरसेवकही होतो. त्या निवडणुकीत मला 16 हजारांचे मताधिक्य मिळाले, त्यातील 14 हजारांचे मताधिक्य तर माझ्या नगरसेवकपदाच्या प्रभागातील होते. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे हे मला कळले. नंतर 2014 व 2019 च्या निवडणुकांमध्ये अनुक्रमे 67 हजार व 74 हजार असे वाढते मताधिक्य मिळवून मी विजयी झालो. कामे करून मी लोकांची मने जिंकल्यामुळे पक्षानेही माझ्यावर विश्वास ठेऊन संधी दिली.

पहिल्या निवडणुकीत फक्त पक्षसंघटनात्मक बांधणीमुळेच माझा विजय झाला. मी कोणीही मोठा रोलमॉडेल नेता पाहून पक्षात आलो नव्हतो. आपल्याला यश मिळवायचे असेल तर नशीबाची साथ लागतेच, माझ्या यशात माझ्या कामाबरोबरच, नशीब आणि पक्ष कार्यकर्त्यांची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. म्हणून तर नगरसेवकपदाच्या पहिल्या निवडणुकीत अपरिचित विभागातून मी निवडून आलो. आतापर्यंतच्या कारकीर्दीत अत्यंत आव्हानात्मक असे फारसे प्रसंग आले नाहीत, तसे पाहिले तर रोजची कामे, रोजच्या जबाबदाऱ्या आव्हानात्मक असतातच. आपण पाच वर्षे कसून मेहनत केली, लोकांची कामे केली तर मग निवडणुकीत फारसे कष्ट पडत नाहीत. जो अभ्यास-गृहपाठ करीत नाही, त्याला परिक्षेची भीती वाटते. जो लोकांची कामे करतो, लोकसंपर्क ठेवतो, तो विजयी होतोच. 

लोकांची कामे आपण करीत रहायची, लोकांना आपली जेवढा वेळ गरज वाटते किंवा हा लोकप्रतिनिधी कायम रहावा, असे जोपर्यंत लोकांना वाटते, तोपर्यंतच ते आपल्याला पदावर ठेवतात यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे जनता जनार्दन आपल्याला पदावर ठेवतील तेवढा वेळ काम करत रहायचे. 

माझा चारकोप मतदारसंघ कामाच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आहे, येथे पंचावन्न टक्के झोपडपट्ट्या आहेत. तेथील रहिवासी बहुभाषिक-बहुधर्मीय आहेत, त्यामुळे त्यांचे येथील प्रश्न वेगवेगळे असतात, त्यामुळे अथक काम करावे लागते. 

यापुढेही मी असाच येईल ती जबाबदारी स्वीकारीत लोकांची कामे करीत राहणार आहे. मी ठराविक महत्वाकांक्षा ठेऊन पक्षात आलो नाही. त्यामुळे लोकांना हव्या असतील त्या सोयी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वडील नसलेल्या शेकडो मुलींचे सामूहिक विवाह मी लावून दिले आहेत.

सांगली-सातारा-कोरेगाव-जत-आटपाडी-अनपटवाडी आदी अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार, शेततळी, तलाव आदी कामे मी केली आहेत. उच्चशिक्षण घेणाऱ्या दोनशे मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. कांदिवलीत महापालिकेच्या सहकार्याने तीस हजार चौरस फुटांचे बहुद्देशीय समाजकल्याण सभागृह, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र आणि विज्ञान प्रयोगशाळा बांधावयाची आहे. या तीनही वास्तू प्रत्येकी दहा हजार चौरस फुटांच्या असतील. वेगवेगळ्या समारंभांसाठी सर्वसामान्यांना सभागृह मिळेल, ज्या मुलांना घरी किंवा शाळेत सोयी वा जागा नसते त्यांना प्रयोगशाळेचा फायदा होईल. तसेच स्वयंरोजगार केंद्रात महिला व तरुणांना कुशल कामांचे प्रशिक्षण मिळेल. त्याखेरीज मतदारसंघातील वाहतूक कोंडी, आरक्षित जागेवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन हे प्रश्नही सोडवायचे आहेत. 

(शब्दांकन – कृष्ण जोशी)

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in