आता थोडा "खोटारडेपणा' मी पण करते : सुप्रिया सुळे 

आता थोडा "खोटारडेपणा' मी पण करते : सुप्रिया सुळे 

पुणे : ``ताई तुम्ही "इन्स्टाग्राम'वर का नाही'' असा प्रश्न मला मुंबईत अपेक्षित होता. पण दौंड, इंदापूरसारख्या भागातील तरुण-तरुणींकडून तो आल्यानंतर मला सोशल मिडियावर असण्याची गरज पटली. त्यातून फायदा शून्य आहे पण तरीही मी आता दररोज "इन्स्टा'वर एक फोटो टाकते. आता थोडा "खोटारडेपणा' मी पण करते..'..'

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली ही "कबुली' आहे. ""तुम्हाला खोटं वाटेल, पण मी इन्स्टाग्रामच्या पूर्णतः विरोधात होते. आता माझं ओव्हर अॅक्टिव्ह इन्स्टा अकाउंट झाले आहे,'' असे त्यांनी खचाखच भरलेल्या एस. एम. जोशी सभागृहातील तरुण-तरुणींसमोर सांगितले आणि उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.

 
सुळे म्हणाल्या, "सोशल मिडिया वगैरे हे सगळे मला उथळ वाटते. त्यातून कोणाचा काय फायदा होतो? "इन्स्टा'मुळे माझ्या मतदारसंघातील किती प्रश्न सुटतात? पण आता मीसुद्धा हा "खोटारडेपणा' करते. ही काळाची गरज आहे. त्यामुळे मी फेसबुक, ट्‌वीटर, इन्स्टा सर्व माध्यमांवर सक्रीय आहे.''

परिवर्तन युवा परिषदेमध्ये भूषण राऊत या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नांवर सुप्रियाताईंनी "सिक्सर' मारला. ""ताईंना अनेकजण किती घाबरतात हे मला माहिती आहे. मी पण त्यांना घाबरतो. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. बारा वर्षांपूर्वी बालाजीनगर येथील एका दौऱ्यात ताईंशी संपर्कात आलो,'' अशी सुरवात करत भूषण याने पहिला प्रश्न विचारला. गेल्या दहा बारा वर्षांत खूप काही बदलले आहे. आतापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये तुम्ही काय शिकलात, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "खरंतर मला न घाबरणाऱ्या आणि माझ्या पक्षात नसलेल्या व्यक्तीने ही मुलाखत घेतली असती तर मला आवडले असते. पण तुम्ही महिलेला घाबरता याचा मला अभिमान आहे. कार्यक्रमाचे "रेकॉर्डिंग' सुरू नसते तर अजून एक गंमत सांगितली असती.'' 

कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात असलेलं वातावरण पवार कुटुंबात आहे. जस प्रत्येक घरात वडील-मुलीचं नातं असत तसच माझं आणि पवार साहेबांचं आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा आदर्श असतात तसे माझेही आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in