नवे उपसभापती म्हणायचे, "" लगीन करायची वाटतेय भिती ...!'' 

कलापथक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आमदार ते विधानसभेचे उपसभापती असा नरहरि झीरवाळ यांचा प्रवास राहिला आहे.
नवे उपसभापती म्हणायचे, "" लगीन करायची वाटतेय भिती ...!'' 
narhari-zirwal

नाशिक : लहानशा आदिवासी पाड्यात, कलापथक गाजवणाऱ्या कुटुंबातील नरहरी झीरवाळ हे आमदार बनले. आता विधानसभेच्या उपसभापतीपदावरही ते विराजमान झाले आहेत. एकेकाळी गावोगावी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करीत त्यांचा उदरनिर्वाह होत होता... 

े राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिंडोरीचे आमदार असलेल्या झीरवाळ यांनी काल ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व सहकारी आमदारांसह विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. एक दर्दी कलाकार, समाजप्रबोधन करणारे कलापथक चालविणारा कलाकार आता विधानसभेच्या आमदारांचे कसे प्रबोधन करतात हे पाहण्यास मिळणार आहे. 

झीरवाळ अनेकदा ते सार्वजनिक कार्यक्रमात देखील आपली कला सादर करुन युवकांचे व आयोजकांचे मन जिंकतात. बाल विवाह, कुटुंब नियोजन यावर जनजागृतीपर 'बंधू- भगिनींनो विचार करा..... दोन पानांचा संसार करा.... मोठ्या या संसाराची होतीय माती.... लगीन करायची आता वाटतेय भिती.' ही त्यांची गाणी खूपच गाजली आहेत. या गाण्यांचे सादरीकरण करून ते लोकांचे लक्ष वेधून घेत. 

विविध कोट्या करीत मुलांनी कलात्मकता अंगीकारावी असे आवाहन करीत 'मला वसतीगृहात प्रवेश मिळाला तो कोणाच्या शिफारशीने नव्हे तर माझ्या कलेमुळे. आता माझ पोट वाढलय, नाही तर मी नाचलोही असतो.' असे सांगत त्यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. 

राजकीय नेते रुक्ष असतात, ही तक्रार झीरवाळ यांच्याविषयी करता येणार नाही. कारण ते खरोखरच कलाकार आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ आदिवासी युवकांचे कलापथकही तयार केले होते. 

झीरवाळ यांचे वडील सीताराम बारकु झीरवाळ यांचेही गावात एक कलापथक होते. पंचक्रोशीत जे जे बोलावतील तिथे सणावाराला त्यांचे कार्यक्रम होत असत. या कार्यक्रमांपासूनच झीरवाळ यांनाही कलेची आवड निर्माण झाली. वडिलांचा हा वारसा त्यांनी पुढे चालवला. गावकऱ्यांना ते खूपच प्रिय आहेत.

पुढे ते वनार (ता. दिंडोरी) गावचे सरपंच झाले. सरपंचपदावर न थांबता त्यांनी आपली राजकीय वाटचाल यशस्वीरित्या सुरू ठेवली. पंचायत समिती, जिल्हा परिषदचे सदस्यही बनले आणि 2004 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि ते थेट आमदारच बनले. 

2009 मध्ये 149 मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र त्यानंतर 2014 मध्ये ते पुन्हा आमदार झाले. 2019 च्या निवडणुकीत तर तब्बल 60हजाराहून अधिक मताधिक्‍याने विजयी झाले. आजही ते सामाजिक उणीवा, वाईट प्रथा, बाल विवाह, कुटुंब नियोजन यावर आदिवासींत जनजागृती करीत असतात.

त्यावेळी आपल्याला या पारंपारिक छंदाचा उपयोग होतो असे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. एकंदर त्यांच्या गाणे, विनोद व शाब्दिक कोट्यांसह सादर केलेल्या कार्यक्रमातून अनेकांना त्यांच्यातील कलाकार दिसला. 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in