हर्षवर्धन जाधव आणि निलेश राणे : राजकारण आहे संयमाचे!

माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव ह नेहमीच चर्चेत राहतात पण वेगळ्या कारणांसाठी. अशी चर्चा होणे लांबच्या राजकारणासाठी योग्य ठरेल का, हा प्रश्न त्यांना पडत नसेल?
हर्षवर्धन जाधव आणि निलेश राणे : राजकारण आहे संयमाचे!
harshvardha-jadhav-nilesh

पुणे : राजकारणात यशस्वी होण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता, असा प्रश्न तुम्ही कोणत्याही राजकीय नेत्याला विचाराल तर त्याचे उत्तर येईल संयम! विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवाने खचू नये, हे सूत्र यशस्वी राजकीय लोकांकडे पाहिल्यानंतर  लक्षात येते. योग्य वेळी विरोधकावर डाव टाकणे आणि त्याला नेस्तनाबूत करणे हे कौशल्याचे काम असते. पण हे सारे विसरून निव्वळ शोबाजी करत, विरोधकांना शिव्या घालण्यातच पराक्रम करणाऱ्या वीरांची संख्याही वाढली आहे. त्यात सोशल मिडियामुळे अशा वीरांना आपण हे लोकोत्तर लोकनेते असल्याचा भ्रम होण्याचा धोका असतो. त्यातून ते परत मग त्याच ट्रीक वापरत असतात.


हे सारे आठवायचे कारण म्हणजे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे गेले दोन दिवस व्हिडीओ प्रसारीत होत आहेत. त्यात त्यांनी त्यांच्या कौटुंबिक बाबींचा उल्लेख केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री व त्यांचे सासरे असलेले रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. खरे तर तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. कोणताही सुजाण माणूस असे कौटुंबिक वाद अशा पद्धतीने जाहीर करणार नाही. याच जाधव यांनी गेल्या आठवड्यात आपण राजकारणातून निवृत्ती घेत पत्नीला आता राजकीय वारसदार म्हणून घोषित केले होते. आपण वारसदार ठरविलेल्या पत्नीच्या विरोधातही त्यांनी व्हिडीओतून टीका केली आहे. स्वतःच टीका करून लोकांनी त्यांना आमदार करावे, असे आवाहनही केले आहे.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने जाधव खचले होते. त्यात पुन्हा कन्नड मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला. त्यातून माणसाला नैराश्य येणे स्वाभाविक आहे. पण त्यातून सावरणे हे तर राजकीय नेत्याचे लक्षण आहे. आपल्यावर मानसोपचार सुरू असल्याचे जाधव हेच व्हिडीओत सांगताना दिसते. जाधव हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मात्र या अनाठायी आक्रमकपणाचे फटकेही त्यांना बसले आहेत. पण यश मिळत गेल्याने आपला तोच मार्ग योग्य, असे त्यांना वाटत असावे. आपल्याच घरातील व्यक्तींची बदनामी करून जाधव यांना काय साध्य करायचे, असेल हे त्यांनाच माहिती. पण त्यांनी केलेली ही कथित भांडाफोड अनेक जण मिटक्या मारत पाहत असल्याचेही दिसून येत आहे. सध्या सोशल मिडियात अशा बाबींची चलती असते. त्यामुळे जाधव यांच्या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळतो. त्याच्या बातम्या होतात. त्यामुळे ते पण त्याचा आनंद घेत असावेत. मात्र असे करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असते, असा सल्ला देणारेही त्यांच्याजवळ कोणी आहेत की नाही, याची शंका येते.

निलेश राणेंचेही असेच!

दुसरे नेते म्हणजे निलेश राणे. त्यांचे वडिल माजी मुख्यमंत्री नारायण राणे आक्रमक होते. तो स्वभाव त्यांच्या दोन्ही मुलांत म्हणजे निलेश आणि नितेश यांच्यात उतरला आहे. मात्र निलेश यांनी केव्हाच हद्द ओलांडली आहे. विरोधकांवर टीका करताना ते सभ्यतेच्या साऱ्या मर्य़ादा सोडतात. त्यांना डी.लिट मिळाली आहे, यावर विश्वास बसणार नाही, अशी त्यांची भाषा असते. ठाकरे घराणे, सिंधुदुर्गातील त्यांचे विरोधक, काॅंग्रेसचे नेते हे त्यांचे नेहमीचे लक्ष्य असतात. सध्या राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर ते सध्या तुटून पडत आहेत. माजी खासदार असल्याने, राणे आडनाव असल्याने आणि चटपटीत मसाला मिळत असल्याने त्यांच्या विधानांना सोशल मिडियात मोठा प्रतिसाद मिळतो.

अनेकजण त्यांच्या टिकेच्या बातम्या करतात. त्यांचे समर्थक त्यांच्या अशा खालच्या भाषेतील विधानांची तळी उचलतात. त्यामुळे राणे आणखी बेहोष होऊन पुढची प्रतिक्रिया देतात. आपले मत आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मिडिया हे चांगलेच आहे. पण ज्याला गंभीरपणे राजकारणात पुढे जायचे, त्याला केवळ त्यावरच वटवट करून चालणार नाही. आपण कोणाला भीत नाही, आपल्यापुढे कोणी नाही हे सातत्याने सांगण्याची गरज नसते. विरोधकांवर टीका जरूर करावी पण ती करताना आपलाही अभ्यास दिसावा, हे अपेक्षित आहे. राजकारणात एकाच वेळी अनेक शत्रू करून चालत नाही. विनाकारण कोणाला शब्दाने दुखविण्यात शहाणपणाही नाही. अर्थात हे सारे सल्ले ज्यासाठी ज्याला आपण चुकतो आहोत, हे कळून घ्यायचे असेल त्यासाठी! आपणच शहाणे आहोत आणि सारा शहाणपणा माझ्या पायापाशी लोळण घेतो आहे, असे ज्यांना वाटते त्यांना सांगून तरी काय उपयोग? `गेट वेल सुन,` असे म्हणण्याशिवाय इतरांकडे काय पर्याय राहतो?

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in