`बबनराव पाचपुते धोका देतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हत...` - I never dreamed that Babanrao would betrayed me says vikhe patil | Politics Marathi News - Sarkarnama

`बबनराव पाचपुते धोका देतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हत...`

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्रात नगरच्या राजकारणाविषयी अनेक गौप्यस्फोट!

पुणे : श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी माझ्या सर्व `गुडविल्स` वापरल्या. पण ऐनवेळी त्यांनी फसवलं. विश्वासाला तडा गेला, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी पाचपुते यांच्याबद्दल आपल्या भावना आत्मचरित्रात व्यक्त केल्य आहेत.

विखे पाटलांच्या `देह वेचावा कारणी` या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यात त्यांनी हा उल्लेख केला आहे. विखे पाटील यांना 1991 च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण या मतदारसंघात काॅंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे ते अपक्ष उभे राहिले होते. काॅंग्रेसकडून यशवंतराव गडाख हे उमेदवार होते. या निवडणुकीत गडाख विजयी झाले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि गडाख यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून विखे पाटील हे उच्च न्यायालयात गेले होते. तेथे त्यांची तक्रार ग्राह्य धऱून गडाख यांची निवड रद्द करण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. या साऱ्या घडामोडींबद्दल विखेंनी आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. यासोबतच निवडणुकीत दगेफटके कसे झाले, हे पण सांगितले आहे.

त्यात त्यांनी तेव्हा श्रीगोंद्याचे आमदार असलेले बबनराव पाचपुते आणि नेवाशेचे तुकाराम गडाख यांचा उल्लेख केला आहे.  ते म्हणतात, विखे पाटील निवडणुकीत पडले, ही कल्पना लोकांना असह्य होती. गडाखांची निवड रद्दबादल झाल्यानंतर मला निवडणुकीला उभे राहा, असा जिल्ह्यातून आणि राज्यातूनही आग्रह सुरू झाला. कार्यकर्त्यांना सुरसुरी होती. ज्यांच्यावर माझा भरवसा तो नेवासा विधानसभा मतदारसंघ तुकाराम गडाखांंचा आणि श्रीगोंदा बबनराव पाचपुतेंचा. दोघंही बरोबर प्रचाराला हिंडले. पण नेमकं याच दोन मतदारसंघात कुठे माशी शिंकली माहीत नाही. पण मला मतं कमी पडली. इथचं दोन ठिकाणी धोका होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. यात विरोधकांचा संबंध नाही. ज्यांना मी मदत केली. त्यांनीच धोका दिला? मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या मंत्रीमंडळात बबनरावांना मंत्री करण्यासाठी मी शब्द टाकावा, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी मी माझ्या सगळ्या `गुडविल्स` वापरल्या. तुकाराम गडाख आणि यशवंतराव गडाख यांच्यामध्ये प्रचंड वैमनस्य होतं. त्यामुळे न्यायालयीन लढ्यात आमच्या बाजूनं साक्ष देण्यासाठी तुकाराम गडाखांचे काही साथीदार तयार झाले होते. अगदी विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे झालं. पण ऐन वेळी त्यांनी फसवलं. वरील दोन्ही व्यक्तींच्या बाबतीच विश्वासाला तडा गेला. तरीही मी त्यांना दूर केलं नाही. नंतरही तुकाराम गडाख खासदारकीला उभे राहिले. तेव्हाही मी त्यांना मदतच केली, असे विखेंनी म्हटले आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख