कॉंग्रेसप्रमाणेच भाजपचाही कारभार भ्रष्टाचारी - मायावती

कॉंग्रेसप्रमाणेच भाजपचाही कारभार भ्रष्टाचारी - मायावती

नागपूर : कॉंग्रेसप्रमाणे भाजपच्या काळातही देशात भ्रष्टाचार वाढला. संरक्षण क्षेत्रही अपवाद नसून कॉंग्रेसने बोफोर्स खरेदीत तर भाजपच्या काळातही राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत बसपच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आज उभय पक्षांवर टीका केली. कॉंग्रेस, भाजप सत्तेत येण्यासाठी पुन्हा आमिष दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत जनतेने सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

कस्तुरचंद पार्क मैदानावर बसपचे विदर्भातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीरसभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर बसपचे राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्रा, समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी, युवा नेते आकाश आनंद, बसपचे महाराष्ट्र प्रभारी कृष्णा बेले, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, नागपूरचे उमेदवार मोहम्मद जमाल, रामटेकचे उमेदवार सुभाष गजभिये, शहरातील बसप, सपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मायावती म्हणाल्या, मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी 15 लाख रुपयांचे आश्‍वासन दिले. परंतु, यासह कुठलेही आश्‍वासन पूर्ण केले नाही. एवढेच नव्हे निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी अर्धवट कामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुलवामा हल्ल्यानंतरही सुरू होता, यातूनच त्यांच्या देशभक्तीचा बुरखाही फाटल्याचे दिसते. कॉंग्रेसप्रमाणेच भाजप सरकारनेही दलित, आदिवासी, मुस्लिम, इतर मागासवर्गीयाना लाभापासून वंचित ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या नोकरीतील आरक्षणाच्या लाभापासून जनतेला वंचित ठेवण्याचे षड्‌यंत्र या दोन्ही पक्षाने केले. या दोन्ही पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांमध्येही आरक्षणाचा टक्का पूर्ण केला नाही. कॉंग्रेस-भाजपच्या हातमिळविणीमुळेच खासगी क्षेत्रात दलितांना आरक्षण मिळाले नाही, असा आरोप त्यांनी केला. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मिटविण्यात ते अपयशी ठरले. आजही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. कष्टकरी लोकांचा त्रास वाढला आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे महागाईत भर पडली असून गरीब, मध्यमवर्गीय भरडले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. कॉंग्रेसच्या प्रतिवर्ष 72 हजार रुपयांच्या आश्‍वासनावर टीका करीत त्यांनी प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. 
सत्ताधाऱ्यांकडून राज्यघटना लक्ष्य 
सत्ताधाऱ्यांकडून राज्यघटना लक्ष्य केले जात असून त्यावर वाकडी नजर केल्यास याद राखा, असा इशारा यावेळी सपचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिला. कॉंग्रेस, भाजप दलितांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत चोरी करणाऱ्याला चौकीदार म्हणणार काय ? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही तोंडसुख घेतले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com