Maval NCP Shelke wins | Sarkarnama

मावळात भाजपच्या बालेकिल्याला राष्ट्रवादीच्या शेळकेंचा सुरुंग 

सरकारनामा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

..

पिंपरीः मावळ (जि.पुणे) विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गेल्या  दोन तपापासूनचा बालेकिल्ला यावेळी मोडीत निघाला. राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी रेकॉर्डब्रेक एक लाख १६ हजारांच्या लीडने विजय मिळविला.

तो मिळविताना मतदारसंघात कुणी पक्ष वा व्यक्तीची आमदारकीची हॅटट्रिक न होण्याचा इतिहास व रेकॉर्डही त्यांनी कायम ठेवला. पक्षापेक्षा वैयक्तिक करिष्मा आणि जोरदार नियोजनबद्ध पूर्वतयारीला शेळकेंच्या विजयाचे श्रेय द्यावे लागेल.  

मावळात लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येण्याचा शेळकेंनी इतिहास केला.त्यांनी दोन तपापासूनचा भाजपचा हा  बालेकिल्ला उध्वस्त केला. राष्ट्रवादीचा पहिला आमदार त्यांच्या रुपाने तेथे झाला कुणालाही आमदारकीची हॅटट्रिक करू न देण्याचा आपला इतिहास मावळच्या मतदारांनी अबाधित ठेवला.

भाजपच्या नगरसेवकाने भाजप मंत्र्याचा केलेला पराभव असे मावळच्या शेळकेंच्या विजयाबाबत म्हणता येईल.कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करीत उमेदवारी मिळवली होती. त्यामुळेच त्यांचा हा विजय  त्यांचा वैयक्तिक करिष्मा,त्यांनी निवडणुकीपूर्वी दोन वर्षापासून सुरु केलेल्या सुनियोजीत  तयारीचा म्हणावा लागेल. त्यात शरद पवारांची झालेली सभा व कधी नव्हे,ती मावळात एकटवलेली राष्ट्रवादी याचाही मोठा हातभार त्यांच्या दणदणीत विजयात आहे.

मावळ आणि भाजप तसेच मावळ आणि भेगडे हे समीकरण झाले होते. १९९५ ला कॉंग्रेसच्या मदन बाफना यांचा पराभव करून भाजपच्या रुपलेखा ढोरेंनी पराभव करीत पुन्हा मावळात पाय रोवले. ते आतापर्यंत कायम होते. १९९९ व २००४ अशा दोनवेळा भाजपचे दिगंबर भेगडे हे आमदार राहिले.त्यांच्यानंतर ही गादी दुसरे भेगडे म्हणजे बाळा ऊर्फ संजय भेगडे हे सांभाळीत होते. 

२००९ व २०१४ ला भाजपचे आमदार झालेले बाळा यावेळी हॅटट्रिकच्या तयारीत होते. मात्र, ती शेळकेंनी चुकविलीच नाही,तर कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांची संधीही हुकवली. कारण मागच्यापेक्षा दुप्पट मतांनी निवडून दिले,तर राज्यमंत्री बाळा भेगडेंना कॅबिनेट मंत्री करु, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील तळेगाव येथील जाहीर सभेत दिले होते.

त्यातूनच भेगडे पुन्हा निवडून येणार नाही,अशी कुणकुण,तर मुख्यमंत्र्यांना लागली नव्हती ना,अशी चर्चा आता सुरु झाली आहे. गतवेळी भेगडेंनी राष्ट्रवादीच्या माऊली दाभाडेंचा २८ हजार १ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी भेगडेंना मिळालेल्या मतांपेक्षा (९५,३१९)यावेळी शेळकेंचे लीड यावेळी जास्त आहे. त्यातून त्यांच्या या विक्रमी विजयाची कल्पना येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख