मावळ लोकसभा मतदारसंघ : श्रीरंग बारणेंना पेलावी लागणार अनेक आव्हाने

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे दोघेही युती होण्यापूर्वी निवडणुकीची तयारी करीत होते. भाजप- शिवसेना युती जाहीर झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या मतदारसंघाचा आग्रह धरला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता आहे.
 मावळ लोकसभा मतदारसंघ : श्रीरंग बारणेंना पेलावी लागणार अनेक आव्हाने

पिंपरी : शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे उमेदवार असलेले लक्ष्मण जगताप सध्या भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष व आमदार आहेत. दोघांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो.

दशकापूर्वी मावळ मतदारसंघ तयार झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेनेचे गजानन बाबर, तर गेल्या निवडणुकीत बारणे निवडून आले. बारणे व जगताप हे दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. जगताप मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते शेकापकडून लढले. मात्र, विधानसभा निवडणुकीचे ते भाजपचे आमदार म्हणून चिंचवड मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर अजित पवार यांचा बालेकिल्ला मानली गेलेली पिंपरी चिंचवड महापालिका जगताप यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मदतीने भाजपकडे खेचून घेतली. बारणे खासदार असले, तरी शिवसेनेचे अत्यल्प नगरसेवक निवडून आले. त्यामुळे शहराच्या राजकारणात जगताप यांचा दबदबा आहे.

भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. युती झाल्यास, बारणे यांचे काम करणार नसल्याचे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे. युतीच्या जागावाटपात मावळ मतदारसंघ शिवसेनेचेकडून भाजपकडे मागून घ्यावा, अशीही मागणी भाजपच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, ही मागणी मान्य होण्याची शक्‍यता खूपच धूसर आहे. भाजपचे अनेक नगरसेवक पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्यामुळे, त्याचा फायदा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला होण्याची शक्‍यता आहे. ती लक्षात घेऊन शिवसेनेला व्यूहरचना करावी लागेल.

या लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ, तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. बारणे यांनी या सर्व मतदारसंघांत चांगला संपर्क ठेवला आहे. रायगड जिल्ह्यात शेकापचे चांगले स्थान आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अॅड. राहूल नार्वेकर यांना एक लाख 82 हजार मते मिळाली होती. यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप एकत्र आहेत.

पार्थ पवार यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरवात केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. पवार यांच्यासोबत तेही मतदारसंघात फिरत आहेत. भाजप शिवसेना युती झाली, तरी पिंपरी चिंचवडमध्ये त्या पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वादाचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल. तसेच, शेकापच्या कार्यकर्त्यांचा फायदा त्यांना रायगड जिल्ह्यातील मतदारसंघात होईल. युती झाल्यामुळे शिवसेनेला भाजपच्या परंपरागत मतांचा फायदा मिळणार आहे. बारणे यांनी गेल्या सहा-सात महिन्यांत मतदारसंघाच्या बांधणीवर जोर दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडताना पक्षाबाहेरील मातब्बर नेत्याची निवड करणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचे मुद्दे
- शास्तीकर रद्द व अनधिकृत बांधकाम नियमित करणे
- पवना जलवाहिनीचा रखडलेला प्रकल्प
- शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्‍न

2014 मधील मतविभाजन
श्रीरंग बारणे (शिवसेना) 5,12,226
लक्ष्मण जगताप (शेकाप) 3,54,829
अॅड. राहूल नार्वेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 1,82,292

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com