घराणेशाही "लादणाऱ्यांना' मतदारांचा लगाम

घराणेशाही "लादणाऱ्यांना' मतदारांचा लगाम


कोल्हापूर ः राबण्यासाठी कार्यकर्ता आणि सत्तेसाठी केवळ आपल्या घरातील व्यक्ती, अशी मानसिकता असणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जिल्हा परिषदेच्या 2012 आणि 2017 या सलग दोन निवडणुकांत घरी बसवण्याचे काम केल्याचे दिसून येते. 

आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर भाष्य न करता मतपेटीतून नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम केले आहे. घराणेशाहीचे "राजकारण' आता कार्यकर्त्यांना नकोसे झाले आहे. पक्षासाठी व नेत्यांसाठी रात्रीचा दिवस केल्यावर कार्यकर्त्यालाही आता सत्तेत येण्याची संधी मिळण्याची गरज असल्याचे दोन्ही निवडणुकांच्या निकालावरून दिसत आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची, हे नेते ठरवत असले तरी कार्यकर्त्याला संधी देण्याचे कामही नेत्यांनी करायचे असते; परंतु प्रत्येक वेळी आपल्या घरातच, नात्यागोत्यामध्येच सत्ता असली पाहिजे, असा नेत्यांचा कल दोन्ही निवडणुकांमधून असल्याचे दिसत आहे.

कार्यकर्त्यांवर घराणेशाही लादण्याचे काम केले जात असल्याने आता कार्यकर्ताही या घराणेशाहीविरुद्ध बंड करून उभा राहत आहे. कार्यकर्त्यांनी बंड करून मतदारांना बरोबर घेऊन घराणेशाहीला चपराक दिल्याचे जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे. 2012 आणि 2017 या निवडणुकांतील निकाल पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांना सतत डावलण्याचा प्रयत्न आणि नेत्यांनी लादलेल्या घरातील उमेदवारीला कार्यकर्ते आणि मतदार मतपेटीतून विरोध करत आल्याचे स्पष्ट होत आहे. नेता महत्त्वाचा असला तरी कार्यकर्तेही तितकेच महत्त्वाचे आहेत, हे जाणवून देण्यासाठी सलग दोन निवडणुकांमध्ये नात्यागोत्याचे राजकारण झिडकारत घराणेशाहीला दणका देण्याचे काम मतदार व कार्यकर्त्यांनी केले.

जिल्ह्यातील अनेक नेत्यांना मतदारांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या राजकारणाला लगाम घालून त्यांना जमिनीवर आणण्याचे काम केले असले, तरी आता पुढील निवडणुकीत तरी नेते यापासून काही धडा घेणार काय, हाच खरा प्रश्‍न आहे. 
2017 च्या निवडणुकीत यांना बसविले घरात 
- माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नातू वीरेंद्र 
- माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर पुतणे संग्रामसिंह 
- माजी खासदार (कै.) उदयसिंह गायकवाड यांचे नातू रणवीर 
- गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचा मुलगा संदीप 
- आमदार चंद्रदीप नरके यांचे भाऊ अजित 
- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांची पत्नी वेदांतिका 
- माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले यांची पत्नी रेखा 
- गोपाळ पाटील यांचा मुलगा विशाल 
- माजी आमदार कै. नरसिंग गुरुनाथ पाटील यांचा मुलगा महेश 
- माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांच्या सून ज्योती पाटील 
- गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे यांचा मुलगा सागर 

2012 च्या झेडपी निवडणुकीत हे झाले पराभूत 
- आमदार हसन मुश्रीफ यांचा मुलगा नविद 
- माजी आमदार के. पी. पाटील यांचा मुलगा रणजित 
- माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह 
- मानसिंग गायकवाड यांच्या पत्नी शैलजादेवी 
- अरुण डोंगळे यांच्या पत्नी अनिता 
- राजकुमार हत्तरकी यांचे पुत्र सदानंद 
- माजी आमदार दिनकरराव जाधव यांची स्नुषा स्वरूपराणी 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com