Mateen Used abusive language so we attacked him : Madhuri Adwant | Sarkarnama

पितृतुल्य वाजपेयींबद्दल अपशब्द काढले, म्हणून मतीनला हिसका दाखवला ! : माधुरी अदवंत 

जगदीश पानसरे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

'तुला श्रध्दांजली द्यायची नसेल तर तू निघून जा' असे मी मतीनला सांगत होते. पण त्याने वाजपेयीबद्दल अपशब्द काढत अपमान केल्यामुळेच त्याला हिसका दाखवला.

औरंगाबादः देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी हे माझ्यासह समस्त भाजप कार्यकर्त्यांसाठी पितृतुल्य होते. त्यांच्या निधनाने आपल्या घरातीलच कुणीतरी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याची आमची सगळ्याची भावना होती. सर्वत्र शोक पसरलेला असतांना त्यांना श्रध्दांजली वाहण्यास सय्यद मतीनने विरोध केला. 

'तुला श्रध्दांजली द्यायची नसेल तर तू निघून जा' असे मी त्याला सांगत होते. पण त्याने वाजपेयीबद्दल अपशब्द काढत अपमान केल्यामुळेच त्याला हिसका दाखवला. मतीनच्या बाबतीत  सभागृहात झालेली घटना ठरवून केली नव्हती, तर ती त्यावेळी उमटलेली उत्स्फूर्त स्वाभाविक प्रतिक्रिया होती ,अशा शब्दांत भाजपच्या नगरसेविका ऍड. माधुरी अदवंत यांनी आपल्या कृतीचे 'सरकारनामा'शी बोलतांना समर्थन केले. 

अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तीमत्व मोठे होते, संपुर्ण आयुष्यात त्यांनी कधी स्वार्थ पाहिला नाही. सर्मपित जीवन जगणाऱ्या वाजपेयींबद्दल केवळ भाजपच नाहीत देशीतील सर्व राजकीय पक्षांना आदर होता. महापालिकेत वाजपेयींना श्रध्दांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याला कुणाचा विरोध होईल असे वाटलेच नाही. 

पण सय्यद मतीन याने 'बाबरी मशीद गिराने वाले को क्‍या श्रध्दांजली देने की' अशी उर्मट भाषा वापरत विरोध केला. तेव्हा मी स्वतः  'तुला श्रध्दांजली द्यायची नसेल तर देऊ नको, सभागृहातून निघून जा, पण वाजपेयीबद्दल वेडवाकड बोलू नको' असे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. यावरही त्याची बडबड सुरूच होती. 

एखाद्या व्यक्तीशी आपले कितीही वैर असले तरी त्याच्या निधनानंतर आपण वाईट बोलत नाही. वाजपेयींचे व्यक्तीमत्व तर खूप मोठे होते, मग त्यांच्याबद्दल एखादा व्यक्ती बाष्कळपणे बोलत असले आणि अशावेळी आम्हाला राग आला नाही तर मग आम्ही स्वतःला भाजपचे कार्यकर्ते कसे म्हणून घ्यायचे. 

त्यामुळे सभागृहात त्यानंतर जो प्रकार घडला ती मतीन याच्या उद्दामपणावर उमटलेली स्वाभाविक प्रतिक्रिया होती. आम्हाला त्याबद्दल वाईटही वाटत नाही. यातून सय्यद मतीन काही धडा घेईल अशी शक्‍यता फारच कमी आहे. पुन्हा त्याने असा प्रयत्न केला तर त्यावेळी काय होईल, कशी प्रतिक्रिया उमटेल हे आज सांगता येणार नाही, असा सूचक इशारा देखील माधुरी अदवंत यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख