Maruti Bhapkar Resigns from Shivsena | Sarkarnama

युती झाल्याने नाराज झालेल्या मारुती भापकरांनी दिला शिवसेनेचा राजीनामा

उत्तम कुटे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पिंपरी चिंचवड शिवसेनेतील मारुती भापकर यांनी आज राजीनामा दिला. युती न पटल्याने ती होताच चार दिवसांतच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला.गेल्या साडेचार वर्षात जहरी टीका एकमेकांवर करुन नंतर शिवसेना आणि भाजपने युती करणे म्हणजे कार्यकर्ते व लोकांना मूर्खात काढण्यासारखे आहे, असे भापकर यांनी राजीनामा दिल्यानंतर 'सरकारनामा'ला सांगितले.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शिवसेनेतील मारुती भापकर यांनी आज राजीनामा दिला. युती न पटल्याने ती होताच चार दिवसांतच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला.गेल्या साडेचार वर्षात जहरी टीका एकमेकांवर करुन नंतर शिवसेना आणि भाजपने युती करणे म्हणजे कार्यकर्ते व लोकांना मूर्खात काढण्यासारखे आहे, असे भापकर यांनी राजीनामा दिल्यानंतर 'सरकारनामा'ला सांगितले.

युती झाल्यानंतर शहर भाजपने शिवसेनेच्या मावळमधील  श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला लगेचच विरोध केला. हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची मागणी नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भाजपमध्ये ही घडामोडी जोरात असताना शिवसेनेलाही हा धक्का मिळाला आहे. भापकर मोठे पदाधिकारी नसले, तरी ते स्वच्छ चारित्र्याचे असल्याने त्यांनी उचललेल्या या पावलाचा परिणाम होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा तर्क आहे. पालिकेत सुरू असलेल्या अनियमिततेविरुद्ध सत्ताधारी भाजपविरोधात त्यांचा एकहाती लढा सुरू होता. त्याला पक्षाची कधीच साथ न मिळाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आणि शेतकरी, कामगारांसाठीचे काम पुढे सुरूच ठेवणार आहे असे ते म्हणाले.

भापकर हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून त्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे, शिवसेनेकडून गत पालिका निवडणूक त्यांनी लढविली होती. २००७ ते २०१२ ते अपक्ष नगरसेवक होते. वॉर्ड सभेची संकल्पना त्यांनी सुरु केली. नंतर सरकारने या योजनेची दखल घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख