marthawada leader | Sarkarnama

नेत्यांच्या काही नातेवाईंकाना स्वीकारले काहींना नाकारले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

राजकीय आखाड्यात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्याचा बळी देवून ऐनवेळी मंत्री, खासदार, आमदार, आजी-माजी नेत्यांच्या मुला-मुली किंवा तत्सम नातेवाइकांची वर्णी लावली जाते. कार्यकर्ता बिचारा मग वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी अन्याय सहन करतो. जिल्हा परिषद निवडणुकीत हा प्रकार प्रकर्षाने दिसून आला. सरसकट सगळ्याच कार्यकर्त्यांवर नेत्यांनी अन्याय केला असे म्हणता येणार नाही. मात्र काही प्रमाणात असे प्रकार निश्‍चितच घडले आहेत. 

औरंगाबाद ः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घराणेशाही पहायला मिळाली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना तिकिटे देत आखाड्यात उतरवले होते. सत्ताधारी पक्षाचे नेते यात आघाडीवर होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यासह कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांनी देखील आपल्या भावी पिढीला राजकारणात आणण्याचा प्रयोग त्यांना उमेदवारी देऊन केला होता. मात्र निकालावरून जनतेने नेत्यांच्या घराणेशाहीला काही प्रमाणात स्वीकारले तर काहींना नाकारल्याचे दिसते. 

राजकीय आखाड्यात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्याचा बळी देवून ऐनवेळी मंत्री, खासदार, आमदार, आजी-माजी नेत्यांच्या मुला-मुली किंवा तत्सम नातेवाइकांची वर्णी लावली जाते. कार्यकर्ता बिचारा मग वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी अन्याय सहन करतो. जिल्हा परिषद निवडणुकीत हा प्रकार प्रकर्षाने दिसून आला. सरसकट सगळ्याच कार्यकर्त्यांवर नेत्यांनी अन्याय केला असे म्हणता येणार नाही. मात्र काही प्रमाणात असे प्रकार निश्‍चितच घडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपली ज्येष्ठ कन्या आशा दानवे-पांडे हिला सोयगांवदेवी गटातून तर पीए गोवर्धन कोल्हे यांच्या पत्नी सुजाता कोल्हे यांना गुरुपिंप्री गटातून उमेदवारी दिली होती. यापैकी मुलगी विजयी तर पीएची बायको पराभूत झाली आहे. दुसरे भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुलगा राहुल याला दुसऱ्यांदा आष्टी गटातून उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. या शिवाय जावई किशोर पवार यांना कन्नड तालुक्‍यातील चापानेर मधून रिंगणात उतरवत भाजपचे कमळ पहिल्यांदा कन्नडमध्ये फुलवले. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बंधू अनिरुद्ध खोतकर यांना निवडून आणत भावाला तिकीट देण्याचा आपला निर्णय कसा योग्य होता हे पटवून दिले. दानवेंच्या पीएची बायको वगळता जिल्ह्यातील मतदारांनी घराणेशाहीला फारसा विरोध केल्याचे दिसत नाही. 
हर्षवर्धन जाधव यांना जोर का झटका 
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्षाच्या विरोधात स्वतंत्र आघाडी करत नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेची निवडणूक देखील लढवली. नगरपालिकेत यश मिळाल्यामुळे त्याची पुनरावृत्ती होईल असा त्यांचा अंदाज होता. मात्र घडले उलटेच शिवसेनेच्याच शुभांगी काजे यांनी जाधव यांच्या पत्नी संजना यांचा पिशोर गटात पराभव केला. पत्नीच पराभूत झाली तिथे आघाडीच्या इतर उमेदवारांचे काय? असा प्रश्‍न होता. अपेक्षेप्रमाणे जाधव यांच्या आघाडीला एकाही गटात विजय मिळवता आला नाही. हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी हा जोर का झटका समजला जातो. दुसरीकडे पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी मात्र मुलगा विलास याला निवडून आणत आपली ताकद सिद्ध केली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले कृष्णा पाटील डोणगावकर यांनी देखील पत्नी देवयानी यांच्यासाठी विजयश्री खेचून आणली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या दोन सुनांपैकी वैशाली पाटील या वैजापूर तालुक्‍यातील घायगांव गटातून विजयी झाल्या आहेत. 
बीडमध्ये अर्धे पराभूत 
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घराणेशाही झालेली दिसली. पण मतदारांनी यापैकी अर्ध्या उमेदवारांना पराभूत करत नेत्यांना धोक्‍याचा इशारा दिला. पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू रामेश्‍वर यांना पराभव स्वीकारावा लागला तर त्यांचे दुसरे बंधू अजय मुंडे मात्र राष्ट्रवादीकडून विजयी झाले आहेत. इथे घराणेशाहीपेक्षा धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन कामाला आल्याचे स्पष्ट होते. याशिवाय माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी पत्नी मंगला यांच्यासह पुतण्या जयसिंह यालादेखील निवडून आणले. जिल्ह्यातील दुसरे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या पत्नी संगीता यांना मतदारांनी पराभूत केले. आमदार आर.टी देशमुख यांचे पुत्र रोहित, भीमराव धोंड यांच्या वहिनी सविता, रमेश आडसकर यांच्या पत्नी अर्चना, पुतणे ऋषीकेश यांना देखील मतदारांनी नाकारले. या उलट नगरपालिकेपासून एकमेकांच्या विरुद्ध लढून क्षीरसागर यांनी मात्र सगळी पदे घरातच ठेवण्यात यश मिळवले. संदीप क्षीरसागर व त्यांचा मातोश्री रेखा क्षीरसागर हे दोघेही जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत. माजी मंत्री शिवाजीराव दौंड व माजी आमदार दरेकर यांच्या सूनबाई आशा व शोभा या दोघीही विजयी झाल्या आहेत. 
लातुरात देशमुखांचीच घराणेशाही 
लातूर जिल्ह्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्त्याना न्याय देता यावा म्हणून माझ्याकडे पद असल्यामुळे माझ्या घरातील कुणालाही निवडणुकीत उतरवणार अशी भूमिका जाहीर केली होती, त्या प्रमाणे ते वागले देखील. त्यामुळे लातूर जिल्ह्यात धीरज देशमुख यांच्या रुपाने देशमुखांचीच घराणेशाही दिसली. जिल्ह्यात कॉंग्रेसचा सफाया झाला असला तरी एकुर्ग्यातून धीरज देशमुख विजयी झाले असले तरी त्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचे स्वप्न मात्र भंगले. माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या पत्नी व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा यांना देखील पराभवाची चव चाखावी लागली. उस्मानाबादेत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना, बसवराज यांचे पुत्र शरण पाटील व मधुकर चव्हाण यांचे चिरंजीव बाबूराव यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण व एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे यांचा मुलगा आदित्य यांना मात्र मतदारांनी नाकारले. 

जय-पराजय झालेले उमेदवार 
धीरज देशमुख-(आमदार अमित देशमुख यांचे बंधू) विजयी 
प्रतिभा कव्हेकर-(माजी आमदार शिवाजी कव्हेकर यांच्या पत्नी) पराभूत 
अर्चना पाटील- (आमदार जगजितसिह राणा यांच्या पत्नी) विजयी 
शरण पाटील- (आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र) विजयी 
बाबूराव चव्हाण-(आमदार मधुकर चव्हाण यांचे पुत्र) विजयी 
किरण गायकवाड-(खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र) पराभूत 
आदित्य गोरे- (एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष) पराभूत 
संताजी चालुक्‍य-(मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे मामा) पराभूत 
संजना जाधव-( आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी दानवे यांच्या कन्या) पराभूत 
देवयानी डोणगावकर (कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पत्नी केंद्रीय राज्यमंत्री भामरे यांच्या कन्या) विजयी 
वैशाली पाटील (माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या सून) विजयी 
विलास भुमरे ( आमदार संदीपान भुमरे यांचे पुत्र) विजयी 
रामेश्‍वर मुंडे ( धनंजय, पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू) पराभूत 
अजय मुंडे ( धनंजय, पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू) विजयी 
मंगला सोळंके (माजीमंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी) विजयी 
जयसिंह सोळंके (माजीमंत्री प्रकाश सोळंके यांचे पुतणे) विजयी 
संगीता धस (माजीमंत्री सुरेश धस यांच्या पत्नी) पराभूत 
रोहित देशमुख (आमदार आर.टी. देशमुख यांचे पुत्र) पराभूत 
सविता धोंडे (आमदार भीमराव धोंडे यांच्या वहिनी) पराभूत 
शोभा दरेकर (माजी आमदार सुभाष दरेकर यांच्या सून) विजयी 
संदीप क्षीरसागर (आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे) विजयी 
रेखा क्षीरसागर (आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या वहिनी ) विजयी 
ऋषीकेश आडसकर (माजी आमदार बाबूराव आडसकर यांचे नातू) पराभूत 
अर्चना आडसकर ( भाजपचे रमेश आडसकर यांच्या पत्नी) पराभूत 
आशा दौंड (माजीमंत्री शिवाजीराव दौंड यांच्या सून) विजयी 
विजयसिंह पंडित (माजीमंत्री शिवाजी पंडित यांचे पुत्र) विजयी 
युध्दजीत पंडित (माजी आमदार बदामराव पंडित यांचे पुत्र) विजयी 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख