marketing minister balasaheb patil appeals citizens to maintain lock down position | Sarkarnama

पुण्यात 95 ठिकाणी भाजीपाला विक्री सुरु 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

मुंबई व पुणे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा माल येत आहे. पुण्यात 95 ठिकाणी भाजीपाला विक्री सुरु करण्यात आली आहे

सातारा :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉक डाऊन जाहिर केला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला सुरळीतपणे उपलब्ध होत असून यासाठी सहकार व पणन विभाग उपक्रम राबवित आहे, तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मुंबई तसेच पुणे येथील बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला तसेच अन्नधान्याचे टॅम्पो, ट्रक आलेले आहेत. सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला भाजीपाला मुबलक प्रमाणात मिळावा यासाठी काम सुरु आहे. छोट्या छोट्या गावांमध्ये, प्रभागांमध्ये भाजीपाला नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्याची विक्री प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, याला जनतेचाही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. तसेच नागरिकांना घरा शेजारील दुकानांमधूनही भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

मुंबई व पुणे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा माल येत आहे. पुण्यात 95 ठिकाणी भाजीपाला विक्री सुरु करण्यात आली आहे. भाजीपाला योग्य त्या प्रमाणात मिळत असून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याची वाहतुक तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट देण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला माल बाजार समित्यांमध्ये घेऊन जावा. सातारा जिल्ह्यात लहान-लहान मंडई सुरु करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे,  यामुळे गर्दी नियंत्रणात राहणार आहे. तसाच प्रयोग राज्यात इतरत्रही होत आहे. कोरोना हे राष्ट्रीय संकट असून याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला घ्यावा. 21 दिवासांसाठी जे लॉक डाऊन जाहिर केले आहे, त्याला जनतेने सहकार्य करावे.

आरोग्य कर्मचारी घरोघरी जात आहेत. परदेशातून किंवा परगावाहून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती या आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख