जिल्हा परिषदेतील युती अंबादास दानवेंसाठी ठरतेय डोकेदुखी 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विजय निश्‍चित समजला जातो. परंतु, जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसशी तेव्हा केलेली युती आता अंबादास दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरते आहे.
जिल्हा परिषदेतील युती अंबादास दानवेंसाठी ठरतेय डोकेदुखी 

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विजय निश्‍चित समजला जातो. परंतु, जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसशी तेव्हा केलेली युती आता अंबादास दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरते आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्हीप आणि आदेश असूनही भाजपचे सदस्य शिवसेनेला मतदान करतील की नाही? याची खात्री देता येत नाही. म्हणूनच अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार समर्थक ८१ सदस्यांचे पाठबळ आपल्या पाठीशी उभे केल्याचे बोलले जाते. 

गेल्या आठवड्यात चिकलठाणा येथे झालेल्या भाजप शक्तीप्रमुखांच्या मेळाव्यात आणि रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना आणि औरंगाबादच्या बैठकीत भाजप सदस्यांनी नाराजीचा सूर आळवला. महायुतीचे अंबादास दानवे यांना मदत करण्याबाबत कुणाचेही दुमत नाही, पण त्यासाठी शिवसेनेला जालना, औंरगाबाद जिल्हा परिषदेतील कॉंग्रेस सोबतची युती तोडायला भाग पाडा अशी मागणी भाजप सदस्यांनी केली आहे. यावर तुम्हाला अविश्‍वास ठराव आणावा लागेल असे सांगत रावसाहेब दानवे यांनी मोठ्या चालाकीने हा चेंडू पुन्हा सदस्यांच्या कोर्टात टोलावला आहे. 

अंबादास दानवे यांना मतदान करण्याचा अधिकृत पक्षाचा व्हीप येण्याची शक्‍यता आहे, शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशा स्पष्ट सूचना दिल्याची माहिती आहे. अशावेळी दगाफटका झाला तर सदस्यांवर पक्षाकडून कारवाई केली जाऊ शकते असा इशाराच रावसाहेब दानवे यांनी अविश्‍वास ठरावाचा मुद्दा उपस्थित करत भाजप सदस्यांना दिल्याचे दिसते. त्यामुळे भाजप सदस्यांची आता कोंडी झाल्याचे चित्र आहे. 

शिवसेनेचा सावध पावित्रा
एकीकडे भाजपकडून जिल्हा परिषदेतील युतीचा मुद्दा उकरून काढत शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने सावध पावित्रा घेत इतर सदस्यांना आपल्या बाजूने करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी औरंगाबादेत 81 सदस्यांची बैठक घेत अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

भाजपने दगाफटका केला तर अधिकची मते हाताशी असावी यासाठी शिवसेनेकडून ही खेळी केली जात आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अंबादास दानवे यांच्यांसाठी बार उडवण्याची तयारी दर्शवली आहे. 

बाबुरावांचे मायक्रो मायनॉरिटी कार्ड?
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची लढत महायुतीचे अंबादास दानवे विरुध्द कॉंग्रेस आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट होत आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी न घालण्याचा एकत्रित संकल्प करत दानवे-कुलकर्णी यांनी नवा प्रयोग केला खरा, पण तो केवळ दिखावाच ठरण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी केलेले 'निवडणुका जिंकण्यासाठी जे जे करावे लागते ते आम्ही करूच' हे विधान त्यासाठी बरेचसे बोलके आहे. बाबुराव कुलकर्णी यांच्या बाबतीत देखील ते आपल्या संकल्पावर ठाम राहतील याची खात्री देता येत नाही. 

महायुतीचे अंबादास दानवे यांनी आपल्याला अधिकाधिक सदस्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे बाबुराव कुलकर्णी मात्र भूमिगतरित्या जुळवाजुळव करत असल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना समोरासमोर आलेल्या कुलकर्णी यांनी अंबादास दानवे यांना पाहून "मी मायक्रो मायनॉरिटी आहे, मला एकदा आमदार होऊ द्या' अशी साद घातली होती.

लोकसभा निवडणुकीपासून 'मराठा फॅक्‍टर' गाजतो आहे. अंबादास दानवे यांना उमेदवारी देतांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या गोष्टीचा देखील विचार केल्याचे बोलले जाते. हर्षवर्धन जाधव यांनी देऊ केलेला पाठिंबा त्यांचेच फलित म्हणावे लागेल. आता दानवे यांच्यासाठी मराठा फॅक्‍टर काम करणार? की मग बाबुराव कुलकर्णी यांनी टाकलेले 'मायक्रो मायनॉरिटी'चे कार्ड चालणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com