बीड जिल्हा - नात्यांतल्या लढती ठरणार रंगतदार!

बीड जिल्ह्यात विविध संस्थांवर वर्चस्व आणि लोकसभेतही मोठ्या फरकाने विजय झाल्याने भाजपचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावलेला आहे; पण विधानसभेला महायुतीतील जागावाटपाचा वाद जिल्ह्यात उफाळणार असून, काही ठिकाणी आमदारांचे तिकीट कापण्यावरूनही डोकेदुखी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस काही तरुण चेहऱ्यांसह मैदानात उतरणार हे निश्‍चित आहे. परळीत मुंडे बहीण-भाऊ आणि बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्यांतील लढतही रंगतदार होणार आहे.
बीड जिल्हा - नात्यांतल्या लढती ठरणार रंगतदार!

बीड जिल्ह्यात विविध संस्थांवर वर्चस्व आणि लोकसभेतही मोठ्या फरकाने विजय झाल्याने भाजपचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावलेला आहे; पण विधानसभेला महायुतीतील जागावाटपाचा वाद जिल्ह्यात उफाळणार असून, काही ठिकाणी आमदारांचे तिकीट कापण्यावरूनही डोकेदुखी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस काही तरुण चेहऱ्यांसह मैदानात उतरणार हे निश्‍चित आहे. परळीत मुंडे बहीण-भाऊ आणि बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्यांतील लढतही रंगतदार होणार आहे. 

बीड जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व एकहाती पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीत मात्र जिल्हापातळीवरील नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळे मतदारसंघापुरती 'सरकारकी' असे राष्ट्रवादीचे धोरण आहे. जिल्ह्यात पीकविम्याचा प्रश्‍न आणि दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना परळी मतदारसंघापुरते केलेले राष्ट्रवादीचे आंदोलन त्याचेच द्योतक आहे. दरम्यान, 2014 मध्ये भाजपने सहापैकी पाच जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीला एक आणि शिवसेना शून्यावर बाद झाली. मात्र, मोदी लाट आणि गोपीनाथराव मुंडेंच्या निधनाची सहानुभूती असताना आणि बीडमध्येच पंतप्रधान मोदींची सभा होऊनही राष्ट्रवादीकडून विजय मिळविणारे जयदत्त क्षीरसागर आता शिवसेनेत गेले  आहेत. मात्र, याच जागेवरून आता महायुतीत पहिले भांडण सुरू होणार आहे. 

बीडच्या जागेवरूनच महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. जिल्ह्यात युतीत एकमेव बीडची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. याच वेळी महायुतीतील शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे येथूनच तयारी करीत असल्याने त्यांच्याकडूनही या जागेसाठी निश्‍चित जोर लागणार आहे. या दोघांसह राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर रिंगणात असतील. परळीत पंकजा मुंडे व धनंजय यांच्यात लढत होईल, असे मानले जात असले, तरी अलीकडे मुंडेंच्या पत्नीने वाढविलेला संपर्क पाहता नणंद-भावजय असाही सामना रंगू शकतो. त्यातच आघाडीत जिल्ह्यातील परळी हा एकमेव कॉंग्रेसच्या वाट्याचा मतदारसंघ असल्याने कॉंग्रेसकडूनही या जागेसाठी दावा सांगितला जात आहे. 

आष्टीत भाजपचे भीमराव धोंडे आमदार असले, तरी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांचा मतदारसंघावर अधिक पगडा आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या 70 हजारांच्या मताधिक्‍क्‍याचे क्रेडिट धसांनीच मारले आहे. त्यांचे चिरंजीव जयदत्त धस यांचा वाढता राजकीय राबता आणि दरेकरांसोबत झालेली सोयरीक ही विधानसभा निवडणुकीची पायाभरणीच होती, असे मानले जाते. त्यामुळे इथे भाजपअंतर्गत पेच होऊ शकतो. राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे यांचे नाव आघाडीवर आहे. माजलगावमध्ये भाजपचे आमदार आर. टी. देशमुख यांच्यावरील नाराजी आणि त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणींमुळे त्यांना आराम दिला जाऊ शकतो. विधानसभेला पंकजा मुंडेंना साथ आणि इतर संस्थांच्या विजयाचे गणित बांधण्याची सोय म्हणून माजलगावमध्ये रमेश आडसकर यांना उमेदवारी मिळू शकते. 

राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची उमेदवारी निश्‍चित आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या केजमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा असतील. पूरक जातीय समीकरण ही भाजपची जमेची बाजू असली, तरी कामांमुळे नाराजी आणि रमेश आडसकर व थोरात गटाशी असलेले वितुष्ट या भाजपच्या उणिवा आहेत. तर जनसंपर्क आणि सामाजिक कामातील सातत्य या राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजू, तर पक्षांतर्गत गटबाजी ही उणीव आहे. गेवराईत उमेदवारीच्या आशेने माजी मंत्री बदामराव पंडित शिवसेनेत गेले. लोकसभेला भाजपसाठी जोराने पळालेही; पण भाजपकडून आमदार लक्ष्मण पवार यांचीच उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे बदामरावांपुढे पेचच आहे. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची उमेदवारी निश्‍चित आहे. 

वंचितमुळे रंगत येणार
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नव्वद हजार मतांचा पल्ला पार करून जिल्ह्यात ताकद दाखवून दिली आहे. केज, परळी, गेवराई व माजलगाव तसेच बीड विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी रंगत आणण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे (केज), कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख (परळी) या नेत्यांनी वंचितसाठी मुलाखती दिलेल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com