लातूर जिल्हा : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची धडक अचंबित करणारी

कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपने मारलेली धडक चकित करणारी आहे. त्याला रोखायचे कसे याची चिंता कॉंग्रेस नेतृत्वासमोर आहे. गड शाबूत राखत युतीला रोखण्याच्या सज्जतेत ते आहेत, तर त्यास जमीनदोस्त करण्याची भाजपची तयारी सुरू आहे.
लातूर जिल्हा : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची धडक अचंबित करणारी

केकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे "कमळ' उमलले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपने उमेदवार बदलून तीन लाखांचे मताधिक्‍य घेऊन वर्चस्व सिद्ध केले आहे. भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात सुरू असलेली घोडदौड आणि वाढते वर्चस्व पाहून कॉंग्रेसच्या नेत्यांना धडकी भरत आहे. भाजपने आता "मिशन विधानसभा' सुरू केले असून, कॉंग्रेसच्या नेत्यांची स्वतःचा मतदारसंघ कसा टिकवावा, यासाठी धडपड सुरू आहे. 

लातूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मोदी लाटेत ढासळत चालला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निलंगेकर यांनी उमेदवार बदलून घेऊन तो सुमारे तीन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी करून दाखविला. सहाही विधानसभा मतदारसंघांत मोठे मताधिक्‍य मिळाले. जिल्हा भाजपमय होत असल्याने नेत्यांत आत्मविश्वास वाढला आहे. भाजपचे वाढते वर्चस्व आणि वंचित बहुजन आघाडीने लोकसभेत लाखाच्या वर घेतलेली मते यामुळे कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. 

लातूर शहर विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांचे वर्चस्व आहे, तेच उमेदवार राहणार आहेत. भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शैलेश लाहोटी इच्छुक असले, तरी यापेक्षा आणखी कोणी तगडा उमेदवार देता येईल का, याची चाचपणी पक्षाच्या वतीने केली जात आहे. दुसरीकडे युती झाली तर ही जागा शिवसेनेला सुटेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघावरही कॉंग्रेसचेच वर्चस्व राहिलेय. या मतदारसंघातून आमदार अॅड. त्र्यंबक भिसे यांचा दावा आहे; पण अमित देशमुख यांचे लहान बंधू जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर हेदेखील इच्छुक आहेत. भाजपच्या वतीने रमेश कराड यांचा उमेदवारीचा दावा कायम आहे. या मतदारसंघातही भाजपकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. कॉंग्रेसमधील माजी आमदारासह राष्ट्रवादीचा एक नेता गळाला लागतो का, याचा प्रयत्न सुरू आहे. 

औसा विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांची उमेदवारी निश्‍चित आहे. येथून देशमुख गटाचे श्रीशैल्य उटगे हेही इच्छुक आहेत. हा मतदारसंघ भाजपला सुटणार की शिवसेनेला हे निश्‍चित नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांचा डोळा आहे. येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांचाच हिरवा कंदील आहे. हा मतदारसंघ भाजप सोडून घेणार हे निश्‍चित आहे. तरीदेखील शिवसेनेच्या वतीने माजी आमदार दिनकर माने, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी हे इच्छुक आहेत. 

निलंगा मतदारसंघात कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील-निलंगेकर आणि संभाजी पाटील-निलंगेकर या काका-पुतण्यातच पुन्हा लढत होण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राहिलेले अभय साळुंके हेही इच्छुक आहेत.  उदगीर या राखीव विधानसभा मतदारसंघात आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारी निश्‍चित आहे. आघाडी झाली तर ही जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे, त्यामुळे तेथे पक्षाचे प्रदेश सचिव संजय बनसोडे हे इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडून लोकसभेचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांनीही पुन्हा एकदा इच्छा दर्शविली आहे. 

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून गेल्यावेळी निवडून आलेले विनायकराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अशोक केंद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार आहे, त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 

जिल्ह्यात 2014 च्या निवडणुकीत भाजपचे आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी तीन आमदार असे समसमान संख्याबळ आहे; पण गेल्या पाच वर्षांत भाजपची घोडदौड सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनेच वर्चस्व राखलेय. विधानसभेतही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहणार आहेत, त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना गड सांभाळण्यासाठी कसरत करावी लागेल. 

संभाजी पाटील निलंगेकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com