Marathwada drought condtion Tembhapuri Dam has no water for last four years | Sarkarnama

याला म्हणतात नियोजन :५० कोटी खर्चून टेंभापुरी धरण बांधले पण चार वर्षात थेंबभर पाणी नाही साचले !

प्रकाश बनकर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

शासन एक व्यक्‍तीस 20 लिटर पाणी देते, आता गाव पाणंदमुक्त   झालयं यामूळे पाण्याची गरजही वाढून प्रति व्यक्‍ती ती 40 लिटरची झालीयं.

औरंगाबाद :  ५० कोटी खर्चून टेंभापुरी धरण बांधले पण चार वर्षात थेंबभर पाणीही नाही साचले अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्यावर  दुष्काळी परिस्थिीतीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात आलेल्या दहा सदस्यीय केंद्रीय पथकाचे अधिकारी चक्रावून गेले . 

दुष्काळाच्या पाहणीसाठी निघालेल्या पथकाने टेंभापुरी धरणाला भेट दिली. यावेळी धरणग्रस्त व शेतकऱ्यांनी पथका समोर दुष्काळ आणि धरणाची परिस्थिती मांडली. टेंभापुरी धरणामूळे ४० गावांचा पाणी प्रश्‍न मार्गी लागेल यासाठी ९०० हेक्‍टर सुपीक जमीन शेतकऱ्यांनी ७ हजार रुपये प्रति हेक्‍टर प्रमाणे दिली होती.

मात्र धरण बनवल्यापासून केवळ एकदाच भरले. गेल्या चार वर्षांपासून धरणात पाण्याच थेंबही आला नाही. या धरणात कायगाव येथून गोदावरीच्या नदीच्या बॅकवॉटरचे पाणी लिफ्ट करून आणावे. कॅनालच्या माध्यमातून नांदुर-मधमेश्‍वरचे पाणी आणा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली. 

या धरणावर ४० ते ५० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. गावातील लोकांना प्यायला पाणी नाही. पैस असणारे पाणी विकत आणत आहे. तर ज्याच्याकडे नाही ते अधिग्रहीत विहिरीतल्या खाऱ्या, दुषीत पाण्यावर अवलंबून आहेत.

यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी सरपंच संतोष खवले, विलास खवले, रामनाथ ढोले, अशोक ढोले यांनी पथकाकडे केली. त्यानंतर मुरमी गावच्या पुंजाराम नीळ यांच्या शेतात भेट देऊन पथकाने उपस्थितांशी संवाद साधला. सुलतानपुर, जिकठाण शिवरातील शेख युनुस शेख,चांद व शेख अहमद यांच्या शेताची देखील पथकाने पाहणी केली. 

"पावसाने दगा दिला, अन्‌ हातच पिके गेली. आता जनावरांसाठीही अन्‌ पिण्यासाठी पाणी नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन एक व्यक्‍तीस 20 लिटर पाणी देते, आता गाव पाणंदमुक्त   झालयं यामूळे पाण्याची गरजही वाढून प्रति व्यक्‍ती ती 40 लिटरची झालीयं.

गावात चार वर्षांपासून टॅंकरने पाणी पुरवल जातयं, पाणी नसल्यानं जनावारांच्या चाराचा प्रश्‍न उभवला असून सरकारचे लोक चारा असल्याचं सांगातात. मात्र वास्तावात चारा नाही. पिकं घेतली पण हाती काहीच आलं नाही. जस प्यायला माणसी पाणी, देता तसं राशन कार्डाचा कोणताही भेदभाव न करता धान्यही द्या अशी मागणी मुरमी गावचे सरपंच विक्रम राऊत यांनी केंद्रीय पथकाकडे केली. 

राज्याच्या दुष्काळी परिस्थिीतीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात आलेल्या दहा सदस्यीय केंद्रीय पथकाने बुधवारपासून (ता.पाच) विविध भागाला भेटी देत पाहणी केली. या पाहणीपुर्वी विभागीय आयुक्‍तालयात केंद्राच्या पथकाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील दुष्काळाच्या पस्थितीचे सादरीकरण केले. 

यानंतर पथक एक मधील केंद्रीय सहसचिव छवी झा, सीडब्ल्यूसी चे श्री. देशपांडे, भोपाळच्या कडधान्य विभागाचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या डॉ. शालिनी सक्‍सेना यांच्यासह राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनित कौर, अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय कृषी संहसंचालक प्रतापसिंह कदम, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टि. एस. मोटे यांनी गंगापूर तालुक्‍यातील टेंभापुरी प्रकल्प, मुरमी आणि सुलतानपुर परिसरातील दुष्काळाची पाहणी केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख