संमेलनाध्यक्ष पदासाठी साहित्यक्षेत्रात रंगले "राजकारण'

संमेलनाध्यक्ष पदासाठी साहित्यक्षेत्रात रंगले "राजकारण'

पुणे : एकीकडे "मर्जीतला संमेलनाध्यक्ष कोण' तर दुसरीकडे "साहित्य महामंडळाला वरचढ ठरणारा संमेलनाध्यक्ष कोण', याची एकमेकांसमोर उभे असलेल्या साहित्य महामंडळाच्या दोन गटात चाचपणी सुरू आहे. त्याचवेळी दुसऱ्या जातीतील उमेदवाराला छुपा पाठिंबा देऊन आपल्यातील पुरोगामित्व सिद्ध करण्याचीही धडपड हे दोन गट करताना दिसत आहेत. त्यामुळे संमेलनाध्यक्ष पदाचे "राजकारण' आत्तापासून रंगू लागल्याचे अनुभवायला मिळत आहे. 

संमेलन स्थळ पक्के झाले की साहित्यक्षेत्रात चर्चा सुरू होते ती संमेलनाध्यक्ष पदाची. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना संमेलनाध्यक्ष करायचे असल्याने बडोदा येथे संमेलन घ्या, अशी एका गटाची इच्छा होती. ती पूर्ण होऊ नये म्हणून दुसऱ्या गटाने बडोदा हे स्थळच नको, असे पक्के केले आणि संमेलन विदर्भातील हिवरा आश्रमाला दिले आणि अध्यक्षही विदर्भातलाच करायचा, हेही ठरवले गेले; पण हे स्थळ वादात सापडल्याने पहिल्या गटाचा पराभव करण्याच्या नादात दुसऱ्या गटालाच पराभव स्वीकारावा लागला. 

स्थळ निवडण्यात पराभव झाला असला तरी संमेलनाध्यक्ष निवडण्यात होऊ नये म्हणून दुसरा गट पुन्हा कार्यरत झाला आहे; पण दुसऱ्या गटाचे हे राजकीय डावपेच पाहून चपळगावकर नाराज झाले आहेत, असे सांगत पहिल्या गटाने निवडणूक प्रक्रियेकडे तटस्थपणे पाहायचे, असे ठरवले आहे. सध्या साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांचे जवळचे मानले जाणारे किशोर सानप, विदर्भ साहित्य संघाचे प्रमुख मनोहर म्हैसाळकर यांच्या जवळचे असलेले रवींद्र शोभणे यांच्याबरोबरच पुण्यातून साहित्यिक राजन खान, रवींद्र गुर्जर यांची नावे संमेलनाध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. त्यांच्या लेखकांसोबत भेटी-गाठी, बैठकाही सुरू झाल्या आहेत; पण महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मुंबई साहित्य संघ (मुंबई), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) यांच्याबरोबरच प्रकाशकांचा गट कोणाच्या पाठीशी उभे राहतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

असेही असतात इच्छुक उमेदवार 
एक गठ्ठा मतांवर डोळा ठेवून साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षाला आणि त्यांच्या पत्नीला संमेलनाध्यक्ष पदासाठी एका इच्छुक उमेदवाराने आपले पुस्तकच अर्पण केले. हा प्रकार आता चांगलाच चर्चेत आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमाला काही इच्छुक उमेदवारांकडून हजेरी लावली जात आहे. हाही चर्चेचा विषय बनला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com