पाणीपुरवठ्यासाठी नगरसेविकेने हाती धरले ट्रॅक्टरचे स्टिअरिंग - Marathi Political News Yavatmal Corporator Tractor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

पाणीपुरवठ्यासाठी नगरसेविकेने हाती धरले ट्रॅक्टरचे स्टिअरिंग

सूरज पाटील 
रविवार, 15 एप्रिल 2018

शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिकेने टँकर सुरू केले आहे. प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, त्यांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी माजी शिक्षण सभापती तथा नगरसेविका कीर्ती राऊत यांनी स्वत:च टँकरचे स्टिअरिंग हाती घेऊन पाणीपुरवठा सुरू केला. त्यांच्या या धाडसाचे कौतुक नागरिक करीत आहेत. 

यवतमाळ : शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिकेने टँकर सुरू केले आहे. प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, त्यांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी माजी शिक्षण सभापती तथा नगरसेविका कीर्ती राऊत यांनी स्वत:च टँकरचे स्टिअरिंग हाती घेऊन पाणीपुरवठा सुरू केला. त्यांच्या या धाडसाचे कौतुक नागरिक करीत आहेत. 

शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळाला पाणी येत नाही. नगरपालिकेने विहिरींचा शोध घेऊन साफसफाई सुरू केली. प्रभागनिहाय नगरसेवकांना पाणीपुरवठ्यासाठी टँकर दिले आहेत. मात्र, प्रभागात लोकसंख्या जास्त असल्याने पाणीवाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप नगरसेवकांवर होत आहे. काही प्रभागांमधील विहिरींना कोरड पडली आहे. त्यामुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपालिकेला दूरवरून टँकरने पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने चालकही आजारी पडत आहेत. पाणी मिळण्यास अडचण निर्माण झाल्यास आपसूकच नागरिकांची ओरड आहेच. 

पाणीवाटपात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी प्रभाग क्रमांक 24च्या नगरसेविका कीर्ती राऊत यांनी स्वत:च पुढाकार घेतला. चालक आजारी आहे, म्हणून टँकर उभा न ठेवता त्या स्वत:च हाती स्टिअरिंग पकडून पाणीपुरवठा करीत आहेत. गेल्या आठवडाभरापासून त्यांचा उपक्रम सुरू आहे. आता चालक कामावर असतानाही त्या दिवसभरात दोन फेर्‍या मारत आहेत. प्रभाग 24मधील लोकसंख्या नऊ हजारांच्या घरात आहे. या प्रभागात राणा प्रतापनगर, सरस्वतीनगर, विकास कॉलनी, एस. टी. कॉलनी, ओम सोसायटीचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रभागात एकही विहीर नाही. त्यामुळे एमआयडीसी येथून टँकरने पाणी आणून पुरवठा सुरू आहे. नगरसेविकाच ट्रॅक्टर चालवून पाणीपुरवठा करीत असल्याचे चित्र बघून नागरिक आश्‍चर्य व्यक्त करून कौतुकही करीत आहे.

यवतमाळ शहरावर सध्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. गेल्या आठवड्यात चालक आजारी होता. पाण्यासाठी नागरिकांचे सतत फोन येत होते. पाण्याने भरलेला टँकर घरीच उभा होता. माझे पती संतोष राऊत यांनी स्वत:च टँकर घेऊन जाण्याचे प्रोत्साहन दिले. आता दररोज दोन फेर्‍या मारत आहे. गृहिणींना वेळेवर पाणी मिळत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटत आहेत. 
- कीर्ती राऊत, नगरसेविका, यवतमाळ नगरपालिका.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख