काँग्रेसची 'कोअर टीम' कर्नाटकात तळ ठोकून : आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे बेंगुळरूची जबाबदारी - Marathi Political News Yashomati Thakur Congress Karnataka | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसची 'कोअर टीम' कर्नाटकात तळ ठोकून : आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे बेंगुळरूची जबाबदारी

उमेश घोंगडे 
बुधवार, 18 एप्रिल 2018

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवायचाच या जिद्दीने कॉंगेस उतरली असून केंद्रीय पातळीवरील सहा जणांची 'कोअर टीम' संपूर्ण निवडणूक हाताळत आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे मुख्य जबाबदारी आहे. शिवाय पक्षाच्या पाच चिटणीसांकडे विविध मतदारसंघांची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे बेंगळूरू शहर व जिल्ह्यातील 32 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवायचाच या जिद्दीने कॉंगेस उतरली असून केंद्रीय पातळीवरील सहा जणांची 'कोअर टीम' संपूर्ण निवडणूक हाताळत आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे मुख्य जबाबदारी आहे. शिवाय पक्षाच्या पाच चिटणीसांकडे विविध मतदारसंघांची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे बेंगळूरू शहर व जिल्ह्यातील 32 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार असलेल्या यशोमती ठाकूर यांना पक्षाने गेल्या महिन्यात पक्षाच्या चिटणीसपदी बढती देऊन त्यांना कर्नाटकची जबाबदारी दिली आहे. या आधी मेघालय विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रभारी म्हणून त्यांनी निवडणुकीत मुख्य जबाबदारी पार पाडली आहे. कर्नाटक निवडणुका व पक्षाच्या तयारीबाबत 'सरकारनामा'शी बोलताना ठाकूर यांनी या निवडणुकीत पक्षाला निश्‍चितपणे यश मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. राज्य सरकारची गेल्या पाच वर्षातील कामगिरी अत्यंत चांगली आहे. पक्षाचे कर्नाटकातील प्रभारी व खासदार के. सी. वेणूगोपाल यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

"माझ्याकडे बेंगळूरू शहर व जिल्यातील 32 मतदारसंघांची जबाबदारी आहे. माझ्यासह पाच चिटणीसांकडे मतदारसंघांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. माजी खासदार माणिक टागोर (तामिळनाडू), माजी खासदार मधुयाक्षी कौर (तेलंगण), आमदार विश्‍वनाथ (केरळ), माजी मंत्री आर. साके (आंध्रप्रदेश) अशी आमची पाचजणांची टीम असून खासदार वेणूगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाचजण काम करीत आहोत," असेही आमदार ठाकूर यांनी सांगितले. आमदार ठाकूर यांच्यासह संपूर्ण टीम निवडणूक होईपर्यंत कर्नाटकात तळ ठोकून राहणार आहे. 

224 पैकी 218 मतदारसंघातील उमेदवार निश्‍चित झाले असून आता केवळ सहा ठिकाणचे उमेदवार निश्‍चित होणे बाकी आहे. मतदारसंघनिहाय आढावा रोजच्या रोज घेण्यात येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष राहूल गांधी आणि इतर नेत्यांच्या सभांचे वेळापत्रक बनविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किती आणि कोणकोणत्या ठिकाणी सभा होणार आहेत. त्यानुसार सोनिया व राहूल गांधींच्या सभांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे पक्षातील अन्य सूत्रांनी सांगितले. कर्नाटक निवडणूक जशी भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची आहे तशीच काँग्रेससाठीदेखील प्रतिष्ठेची असल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख