इंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि युती सरकार एकाच माळेचे मणी - राधाकृष्ण विखे पाटील

विखे पाटील यांनी आत्महत्या करणारे यवतमाळ जिल्ह्यातील सावळेश्वरचे शेतकरी माधवराव रावते, राजूरवाडीचे शंकर चायरे आणि टिटवीचे प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी या आत्महत्यांच्या घटना आणि सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती घेतली. त्यानंतर यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका केली.
इंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि युती सरकार एकाच माळेचे मणी - राधाकृष्ण विखे पाटील

यवतमाळ : ''कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्यामुळे स्वतःची चिता रचून आयुष्य संपवणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी माधवराव रावते यांच्या आत्महत्येचे पुरावे दडवून तो एक अपघात सिद्ध करण्याचा खटाटोप भाजप-शिवसेनेचे सरकार करते आहे. खून करून पुरावे दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि आत्महत्येचे पुरावे दडपणाऱ्या या सरकारमध्ये काहीही फरक नाही. मुखर्जी, कुरूंदकर, कामटे आणि हे सरकार एकाच माळेचे मणी आहेत,'' अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर केली.

विखे पाटील यांनी आत्महत्या करणारे यवतमाळ जिल्ह्यातील सावळेश्वरचे शेतकरी माधवराव रावते, राजूरवाडीचे शंकर चायरे आणि टिटवीचे प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी या आत्महत्यांच्या घटना आणि सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती घेतली. त्यानंतर यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, ''या सरकारने सावळेश्वर येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. शासनाच्या निष्क्रियतेमुळे ही आत्महत्या असल्याची कबुली दिली जात नाही. उलटपक्षी आत्महत्येचे पुरावे दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्याने झालेल्या शेतकरी आत्महत्या एकप्रकारे  सरकारने केलेल्या हत्याच आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे असंवेदनशील आणि कोडगे सरकार कधीही झाले नव्हते. या सरकारला शेतकऱ्यांच्या जीवाची अजिबात किंमत राहिलेली नाही, हेच या शेतकरी आत्महत्यांमधून स्पष्ट झाले आहे."

"माधवराव रावतेंच्या आत्महत्या प्रकरणी सकृतदर्शनी दिसणारी वस्तुस्थिती आणि तलाठी-तहसिलदारांचा अहवाल नाकारून सरकार हा अपघातच असल्याचे सांगते आहे. त्यासाठी या आत्महत्येचे पुरावेही दडपले जात आहेत. खून पाडून पुरावे दडपण्यासाठी जी कारवाई अभय कुरुंदकर, युवराज कामटे, इंद्राणी मुखर्जीवर झाली, ती कारवाई रावते आत्महत्या प्रकरणात करावी. सरकार व उमरखेडच्या विभागीय अधिकाऱ्याविरूद्ध ३०२ आणि पुरावे दडपण्याचे गुन्हे दाखल करावे," अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.

रावते यांची आत्महत्या हा एक अपघात असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत सांगावे, हेच मुळात अतिशय संशयास्पद आहे. रावते यांनी आत्महत्या केली की त्यांचा अपघात झाला? यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत खुलासा करणे त्यांच्या कार्यकक्षेत बसत नाही. या उपविभागीय अधिकाऱ्याला पत्रकार परिषद घेण्याचे आदेश कोणी दिले होते? की त्यांनी स्वतःहूनच हा चोंबडेपणा केला होता? अशा गंभीर आणि संवेदनशील प्रकरणावर प्रसारमाध्यमांकडे भाष्य करताना त्यांनी शासनाची परवानगी घेतली होती का? असे  प्रश्न विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केले.

भाजप-शिवसेना सरकारची यवतमाळ जिल्ह्याशी वैयक्तिक ‘दुश्मनी’ आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. "यवतमाळमधील एकूण ७ पैकी ५ जागांवर भारतीय जनता पक्षाचे आमदार असताना या जिल्ह्यावर भाजप सरकारने सातत्याने फक्त अन्यायच केला आहे. किटकनाशकांच्या फवारणीत ''यवतमाळ जिल्ह्यातील २४ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला. पण सरकारने गुन्हे दाखल करण्यापलिकडे काहीही कारवाई केली नाही. मंडी टोळीसारख्या वाढती संघटीत गुन्हेगारी आणि त्याला मिळणारा मंत्र्यांचा राजाश्रय सुद्धा दुर्दैवाने याच जिल्ह्याच्या नशिबात आला आहे. त्यावर देखील या सरकारला कारवाई करता आलेली नाही," असे सांगत सात पैकी पाच आमदार निवडून दिल्यानंतरही त्याची परतफेड या पद्धतीने होणार असेल तर यवतमाळकरांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाला कशासाठी निवडून द्यायचे? असा प्रश्न सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com