लातूर- उस्मानाबाद- बीडमध्ये शिवसेनेची भूमिका काय? 65 मतांचे दान कोणाच्या झोळीत टाकणार?

लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत अंतिम टप्प्यात असली तरी शिवसेनेत अद्याप शांतताच आहे. राज्यात स्वबळाची डरकाळी फोडणारी शिवसेना या मतदार संघात काय भूमिका घेणार, आपली 65 मते कोणाच्या झोळीत टाकणार याची उत्सुकता लागली आहे.
लातूर- उस्मानाबाद- बीडमध्ये शिवसेनेची भूमिका काय? 65 मतांचे दान कोणाच्या झोळीत टाकणार?

बीड : लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत अंतिम टप्प्यात असली तरी शिवसेनेत अद्याप शांतताच आहे. राज्यात स्वबळाची डरकाळी फोडणारी शिवसेना या मतदार संघात काय भूमिका घेणार, आपली 65 मते कोणाच्या झोळीत टाकणार याची उत्सुकता लागली आहे.

राज्यातील सहा विधान परिषद मतदार संघाच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. मराठवाड्यात लातुर-उस्मानाबाद-बीड व परभणी-हिंगोली या दोन मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे. अगोदरपासून स्वबळाची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेने या निवडणुकीत त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे दिसते. 
कोकण, नाशिकसह अगदी शेजारच्या परभणी-हिंगोली मतदार संघातही उमेदवार जाहीर केले आहेत. रविवारीच परभणी-हिंगोलीतून विप्लव बाजोरिया पक्षाचा 'एबी फॉर्म' घेऊन आले. मात्र, लातूर-उस्मानाबाद-बीडबाबत शिवसेनेत शांतताच दिसते. भाजप - शिवसेना युतीची चर्चाही नाही. भाजपनेही या मतदार संघाबाबत सेनेशी संपर्क साधलेला नाही. तशी या मतदार संघात शिवसेनेची ताकद तोडकी आहे. पण, 'मोडके मुसळ उतरंडीला भारी', म्हणतात तसे एखाद्या उमेदवाराचा घातही या मतांमुळे होऊ शकतो. 

मतदार संघाच्या तीन जिल्ह्यात पक्षाचे 1007 पैकी 65 मतदार आहेत. यामध्ये 47 नगरसेवक (स्वीकृतसह), 16 जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. 34 नगरसेवक, 11 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 सभापती अशी पक्षाची सर्वाधिक मतदार उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तर, खालोखाल बीडमध्ये 6 नगरसेवक, 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 सभापती आहे. लातूरमध्ये केवळ 7 नगरसेवक आणि 1 जिल्हा परिषद सदस्य आहेत. एकूण मतांच्या साडेसहा टक्के मते असलेल्या शिवसेनेला भाजपने केवळ गृहीत धरले की काय, असाही प्रश्न आहे. 

मात्र, मतांचा हा आकडा निर्णायक नसला तरी विजयाचे गणित जुळवण्यासाठी ही मते महत्वाची आहेत. तसे, मतांच्या आकड्यावरून शिवसेना स्वतंत्र उमेदवार देईल अशी सुतराम शक्यता नाही. याच तीन जिल्ह्याच्या शिक्षक मतदार संघात सेनेने स्वतंत्र उमेदवार देण्याचा प्रयोग पुरता फसला होता. ह्या निवडणुकीचे मतदार जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक असल्याने पक्षाच्या मतदारालाही 'खुश' करावे लागते. त्यामुळे तसा उमेदवार शोधणेही सेनेसाठी जिकरीचे आहे. या मतदार संघात भाजप व राष्ट्रवादीत प्रमुख लढत होईल हे निश्चित आहे. दोन्ही पक्षाने सर्वार्थाने सक्षम उमेदवार हेरले आहेत. सर्वत्र सत्ता आणि दोन मंत्री असल्याने निवडणूक जिंकण्यासाठी भाजप जोर लावणार यात शंका नाही. तर, काँग्रेसचे रनिंग आमदार असतानाही आपला उमेदवार उभा करण्याची पूर्ण तयारी राष्ट्रवादीने केली आहे. 

या जागेसाठी पक्षाने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांजवळ प्रतिष्ठा पणाला लावल्याने विजय मिळवल्याचा निरोपच त्यांना द्यावा लागनार आहे. आता प्रश्न आहे शिवसेना नेत्यांची मर्जी कोण जिंकतो याचा.  सहा जागांपैकी एखाद्या ठिकाणी भाजपची मदत घेऊन शिवसेना ही मते त्यांना देते की 'दुश्मन का दुश्मन अपना दोस्त' या सूत्राने या मतांचे दान राष्ट्रवादीच्या झोळीत टाकते हे लवकरच कळेल. मात्र, पक्ष स्तरावर काहीही निर्णय झाला तरी बीड जिल्ह्यातील सेनेच्या 11 पैकी काही मते भाजपला मिळतील असा होरा आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या गटाची 5 मते असून त्यांची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी अलीकडच्या काळातील राजकीय जवळीक पाहता पंडित भाजपला मदत करतील असे मानले जाते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com