ग्रामसंवाद यात्रेतनंतर आमदार संगीता ठोंबरें श्रमदान चळवळीत - Marathi Political News Sangita Thombre Shramadan | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामसंवाद यात्रेतनंतर आमदार संगीता ठोंबरें श्रमदान चळवळीत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सुरुवातीला आमदार संगिता ठोंबरे यांनी ग्रामसंवाद यात्रेत महिलांबरोबर संवाद साधला. घरभेटी, सार्वजनिक कार्यक्रमांसह हरिनाम सप्ताहांनाही त्यांनी हजेरी लावली. विकास कामांची उद॒घाटने करण्याबरोबरच सुरु असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. सध्या मतदार संघातील केज आणि अंबाजोगाई तालुक्यात सध्या वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान चळवळ जोरात असून यामध्ये त्या अलिकडे भाग घेत आहेत. 

बीड : केज विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनी ग्राम संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील अनेक गावांन भेटी दिल्यानंतर आता वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने सुरु असलेल्या श्रमदान चळवळीतही त्या भाग घेत आहेत. स्वत: श्रमदान करुन महिलांना आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्या उपस्थितांशी संवादही साधत आहेत. 

अंबाजोगाई, केज आणि बीड या तीन तालुक्यांत विस्तारलेल्या मतदार संघाचा दौरा करण्याच्या निमित्ताने त्यांनी अधिवेनशनानंतर ग्रामसंवाद यात्रा काढली. यामध्ये ग्रामसंवादाबरोबर त्यांनी विविध हरिनाम सप्ताहाच्या किर्तनाचा लाभ असा दुग्ध शर्करा योगही साधला. किर्तनानंतर भाविकांच्या पंगतीमध्येच बसून काल्याचा महाप्रसादही घेतानाचे छायाचित्रे त्यांचे समर्थक सोशल मिडीयावर व्हायरल करत होते. गावांमध्ये जाणे, लोकांशी संवाद साधणे, सार्वजनिक प्रश्न आणि त्याच्या सोडवणुकीची चर्चा करण्याबरोबरच आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून त्या बुथ प्रमुखांशीही त्यांनी चर्चेची पहिली फेरी संपविली आहे. 

त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये मंजूर झालेली विकास कामे, कामांच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी घेतला. दरम्यान, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केज आणि अंबाजोगाई तालुक्यांतील गावांनी सहभाग घेतला आहे. गाव पाणीदार करण्यासाठी महिला- पुरुष श्रमदान करत आहेत. यामध्ये संगीता ठोंबरेही श्रमदान करण्याबरोबर उपस्थितांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविण्यास हातभार लावत आहेत. गोटेगाव, डोंगरपिंपळा व कोदरी येथे श्रमदानाचे त्यांचे फोटो समर्थकांकडून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. आता त्यांच्या श्रमाचे फळ म्हणून गावे पाणीदार होण्याबरोबरच त्यांच्या झोळीत मतांचे दान पडण्यासही हातभार लागेल असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख