तहानलेल्या ग्रामस्थांसाठी नयना गावितांनी गाठले मंत्रालय!  - Marathi Political News Nayana Gavit Babanrao Lonikar | Politics Marathi News - Sarkarnama

तहानलेल्या ग्रामस्थांसाठी नयना गावितांनी गाठले मंत्रालय! 

संपत देवगिरे 
सोमवार, 7 मे 2018

इगतपुरीतील विविध धरणांतुन अगदी मुंबईपासून तर नगरपर्यंत सगळ्यांची तहान भागवली जाते. मात्र, या धरणांच्या पायथ्याशी वसलेल्या गावांनाच घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशा पाच गावांच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी काँग्रेसच्या युवा नेत्या, जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित यांनी थेट मंत्रालय गाठले. दिवसभर पाठपुरावा केला. त्यांची धडपड पाहुन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही त्यांचे कौतुक करीत मागणीला तात्काळ मंजुरी दिली. 

नाशिक : इगतपुरीतील विविध धरणांतुन अगदी मुंबईपासून तर नगरपर्यंत सगळ्यांची तहान भागवली जाते. मात्र, या धरणांच्या पायथ्याशी वसलेल्या गावांनाच घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशा पाच गावांच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी काँग्रेसच्या युवा नेत्या, जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित यांनी थेट मंत्रालय गाठले. दिवसभर पाठपुरावा केला. त्यांची धडपड पाहुन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही त्यांचे कौतुक करीत मागणीला तात्काळ मंजुरी दिली. 

या परिसरात दारणा, मुकणे, वैतरणा यांसह सात मोठी धरणे आहेत. त्यातुन नगर जिल्ह्यापासून तर थेट मुंबई शहराचीही तहान भागवली जाते. मात्र, दुर्गम आदिवासी भाग असल्याने स्थानिकांची मात्र धरण उशाशी अन्‌ नागरीक उपाशी अशी स्थिती आहे. या धरणांलगतच्या बेलगाव कु-हे, कु-हेगाव, नांदूरवैध, अस्वली स्टेशन आणि नांदगाव बुद्रुक या गावांना सध्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पावसाळ्यात येथे तीन हजार मिलीमीटर पाऊस होते. मात्र, उन्हाळ्यात सगळेच स्त्रोत कोरडे होतात. येथील पाणीपुरवठा योजना केव्हाच कालबाह्य झाल्या आहेत. ही व्यथा मांडुनही सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करीत होत्या. 

त्यामुळे नयना गावित यांनी दोन दिवसांपुर्वी थेट मंत्रालय गाठले. त्यांनी विविध विभागांकडे ही समस्या मांडली. त्या स्वछता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे गेल्या. त्यांनी महिलांची वणवण, अडचणीसह या समस्या पोटतिडकीने मांडल्या. त्यांची तळमळ पाहुन मंत्र्यांनीही त्यांचे कौतुक केले. मंत्र्यांनी या गावांसाठी राष्ट्रीय पेयजल निधींअंतर्गत पाणी योजना तात्काळ मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. त्यातुन पाच गावांचा प्रश्‍नावर तोडगा निघणार आहे. या गावांचे सरपंच दिलीप मुसळे, उपसरपंच संतोष यंदे, राजाराम गुळवे, संपत धोंगडे, ज्ञानेश्वर धोंगडे, जेष्ठ नेते वसंतराव मुसळे, पंढरी मुसळे, साहेबराव धोंगडे, तानाजी काजळें, बन्सी पागेरे, दादाभाऊ शिरसाठे, रतन पागेरे, दत्तात्रय पासलकर आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही नयना गावित यांचे कौतुक केले असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख