Marathi Political News Nagar Police Prize Scheme | Sarkarnama

हत्यारे सापडून देणारांविषयी नगर पोलिसांची अशीही बक्षिस योजना

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 मे 2018

जिल्ह्यात केडगाव व जामखेड येथे गोळ्या झाडून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या. त्यामुळे अवैध हत्याराचे कनेक्शन तपासण्याची व त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी बक्षिस योजना जाहीर केली आहे. हा प्रकार म्हणजे दुसऱ्याच्या छडीने साप मारण्याचा प्रकार होत असल्याची टीका होत आहे.

नगर : जिल्ह्यात केडगाव व जामखेड येथे गोळ्या झाडून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या. त्यामुळे अवैध हत्याराचे कनेक्शन तपासण्याची व त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी बक्षिस योजना जाहीर केली आहे. हा प्रकार म्हणजे दुसऱ्याच्या छडीने साप मारण्याचा प्रकार होत असल्याची टीका होत आहे.

जिल्ह्यात अवैध दारुधंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यातूनच गुन्हेगारी फोफावते. अवैध वाळूविक्रीतून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आहे. थेट तहसीलदारांवर हे वाळुतस्कर वाहने घालतात, ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद आहे. वाळुतस्करांची मुजोरगिरी माहिती असूनही पोलिसांकडून हवी तशी कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या लोकांकडे गावठी कट्टे, गुप्ती, चाॅपर, तलवारी अशी हत्यारे सर्रास दिसून येतात. वाळुतस्करांच्या मुसक्या आवळल्या तर ही हत्यारे आपोआप समोर येतील, पण पोलिस सर्वसामान्यांच्या कोर्टात हा चेंडू टोलवत आपण नामानिराळे राहिले आहेत. गुन्हेगारीचे सर्व रेकार्ड पोलिसांकडे आहे. एका-एका गुन्हेगाराची झडती घेतल्यास त्याच्या घरात अशा पद्धतीची हत्यारे सापडू शकतात. 

मात्र सर्वसामान्य लोक अशा गुंड लोकांची नावे पोलिसांना सांगतील का, याबाबत शंका आहे. कारण किरकोळ बक्षिसासाठी नावे सांगून आपले नावही संबंधित गुंडाला कळले, तर हे मोठे बालंट अंगावर येण्याची शक्यता असते. शिवाय पोलिस व संबंधित गुंडाचे लागेबांधे सर्वसामान्यांनाही माहिती असतात. हेच पोलिस नावे सांगणाराचेच नाव गुंडाला सांगणार नाहीत कशावरून, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. अवैध दारुधंद्याच्या भट्ट्या पोलिसांना माहिती असतात. जुगार, मटका खेळण्याची ठिकाणी व नावे पोलिसांना माहिती असतात. असे असले, तरी लोकांनी नाव सांगितले, म्हणून कारवाई केल्याचे दाखवून पोलिस यातून काय मिळविणार. उलट सर्वसामान्यांचा बळी घेण्याचाच हा प्रकार होऊ शकेल. त्यामुळे पोलिसांनी जाहीर केलेली ही बक्षीस योजना म्हणजे केवळ फार्स असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

अशी आहे बक्षिस योजना
जिल्ह्यातील गावठी कट्टे, तलवार, गुप्ती अशी हत्यारे कुणाजवळ आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी राबविली आहे. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही योजना जाहीर केली आहे. अवैध पिस्तूलाबाबत माहिती दिल्यास २५ हजार रुपये बक्षिस, तलवार, चाॅपर, दहशत करणे, टोळीची माहिती देणारास पाच हजार रुपये, अवैध सावकारी, दारू, जुगार, मटका आदींची माहिती देणाराला दोन हजार, गांजा, अफू, चरस, गुटखा, सुगंधी तंबाखू आदींची माहिती देणारास पाच हजार, तर पसार आरोपी, कुंटणखाना आदींची माहिती देणारांना पाच हजार रुपयांचे बक्षिस पोलिस प्रशासनाने जाहीर केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख