महेश झगडेंची पाठ फिरताच भूमाफीयांवर पोलिसांचे कृपाछत्र?  - Marathi Political News Mahesh Zagade Land Scam Police | Politics Marathi News - Sarkarnama

महेश झगडेंची पाठ फिरताच भूमाफीयांवर पोलिसांचे कृपाछत्र? 

संपत देवगिरे 
शनिवार, 28 एप्रिल 2018

त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थान महसुल रेकॉर्डमध्ये नियमबाह्य बदलाने दोनशे कोटींच्या जमिनीचे हस्तांतरण झाले होते. विभागीय महसुल आयुक्त महेश झगडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्याबाबत पोलिसांत तीन तहसीलदारांसह देवस्थानचे विश्‍वस्त, बिल्डर यांच्यासह सव्वीस जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला. मात्र अद्यापही पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. महेश झगडेंची पाठ फिरताच या संशयीतांवर जणु पोलिसांनी कृपाछत्रच धरल्याची चर्चा आहे. 

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थान महसुल रेकॉर्डमध्ये नियमबाह्य बदलाने दोनशे कोटींच्या जमिनीचे हस्तांतरण झाले होते. विभागीय महसुल आयुक्त महेश झगडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्याबाबत पोलिसांत तीन तहसीलदारांसह देवस्थानचे विश्‍वस्त, बिल्डर यांच्यासह सव्वीस जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला. मात्र अद्यापही पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. महेश झगडेंची पाठ फिरताच या संशयीतांवर जणु पोलिसांनी कृपाछत्रच धरल्याची चर्चा आहे. 

त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थानच्या 225 एकरांपैकी 185 एकर जमिनीवर कूळ बदल करुन दोनशे कोटींचा जमिन घोटाळा तत्कालीन विभागीय महसुल आयुक्त महेश झगडे यांनी उघडकीस आणला होता. त्याचा अहवाल विधीमंडळालाही दिला. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावर कडक ताशेरे ओढत कारवाईची सुचना केली होती. याबाबत धर्मदाय आयुक्तांकडेही सुनावणी सुरु आहे. त्यानंतर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, बांधकाम व्यवसायिक सचिन दप्तरी, विश्‍वस्त महाजन बंधु यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. 

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सर्वांनीच न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, शासकीय अधिकारी वगळता इतरांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही. यातील आरोपींना अटक होऊन तपास करणे अपेक्षीत होते. मात्र पोलिसांनी अद्याप त्याबाबत काहीही केलेले नाही. जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे यांच्याशी संपर्क साधला असता हा महसुल विभागाचा तांत्रिक, कायदेशीर क्‍लीष्ट विषय आहे. योग्य कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर कारवाई होईल. अशी भूमिका मांडली होती. 

महसुल विभागानेही ही कागदपत्रे सादर करण्याची कोणतीही घाई केलेली नाही. दोन महिने उलटल्यावरही कोणालाही अटक तर दूर, साधी चौकशीही झालेली नाही. त्यामुळे महेश झगडे यांची मंत्रालयात प्रधान सचिव पदी नियुक्ती झाल्यावर त्यांची पाठ फिरताच कोलंबिका घोटाळ्यातील आरोपींवर पोलिस प्रशासनाने जणु आपले कृपाछत्र धरल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख