पोलिसांच्या पुढाकाराने सुशिक्षितांना रोजगार : बीड पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांचे नवे सूत्र - Marathi Political News G Shridhar Employment | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांच्या पुढाकाराने सुशिक्षितांना रोजगार : बीड पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांचे नवे सूत्र

दत्ता देशमुख 
बुधवार, 18 एप्रिल 2018

गुन्हे होण्याचे आणि करण्याचे मुळ शोधून तेच उपटून काढले तर गुन्हेगारच तयार होणार नाहीत आणि परिणामी गुन्ह्यांची संख्याही घटेल असे नवे सूत्र बीडचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शोधले आहे. त्यांच्या पुढाकाराने सव्वापाचशे बेरोजगार तरुणांना कंपन्यांमध्ये नोकऱ्या लागल्या आहेत. 

बीड : पोलिस दलात अधिकाऱ्यांबाबत खमक्या अधिकारी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशा प्रचलित विशेषणांसह अलिकडे सिंघम वगैरे विशेषणेही वाढत आहेत. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी मोडीत काढणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत अशी विशेषणे लावली जातात. मात्र, गुन्हे होण्याचे आणि करण्याचे मुळ शोधून तेच उपटून काढले तर गुन्हेगारच तयार होणार नाहीत आणि परिणामी गुन्ह्यांची संख्याही घटेल असे नवे सूत्र बीडचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शोधले आहे. त्यांच्या पुढाकाराने सव्वापाचशे बेरोजगार तरुणांना कंपन्यांमध्ये नोकऱ्या लागल्या आहेत. 

त्यांचे हे सुत्र इतर पोलिस अधिकाऱ्यांनीही अवलंबिण्यासारखे आहे. तसेच, जर बाहेर जिल्ह्यातला अधिकारी बीड जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी येवढी खाटाटोप करत असेल तर जिल्ह्यातील नेत्यांनीही असे प्रयत्न करावेत अशी जनभावना आहे.

स्वत:च्या करिअरमध्ये डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगलेल्या जी. श्रीधर यांना इंजिनिअर व्हावे लागले. मात्र, क्रिकेटपटू असलेल्या जी. श्रीधर यांनी स्पर्धा परीक्षेत पहिल्याच धडक्यात वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस होत स्वप्नाच्या कैकपट यश मिळविले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून पदवी हातात पडताच त्यांना चांगल्या कंपनीने नोकरीसाठी पायघड्याही अंथरल्या होत्या. त्यामुळे नोकरीसाठीच्या खस्ता त्यांना माहित नाहीत. मात्र, सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्यांतून काय होते हे पोलिस अधिकारी झाल्यानंतर त्यांना चांगलेच उमजले. 

पोलिस अधिकारी म्हणून गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हेगारी क्षेत्रात येणारे अनेकजण सुशिक्षित असल्याचे त्यांना आढळले. गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहीली तर चांगले शिक्षण असूनही कुठली नोकरी नाही आणि रोजगारही नसलेली तरुण मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे त्यांना आढळले. एखादा खमक्या अधिकारी गुन्हेगारी मोडीत काढू शकतो, गुन्हेगारांवर वचक निर्माण करु शकतो. मात्र, त्याची बदली झाल्यास ही प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढते हे हमखास दिसते. त्यामुळे गुन्हे रोखणे, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याबरोबर गुन्ह्यांकडे सुशिक्षितांनी वळूच नये असा नवे सूत्र त्यांनी पोलिस खात्याला दिले आहे. 

बीड जिल्ह्यात सुशिक्षीत बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे. या तरुणांनी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नये म्हणून त्यांच्या हाताला काम देण्याची योजना त्यांनी आखली. बीड पोलिस दलाच्या पुढाकाराने कंपन्यांना बीडमध्ये रोजगार मेळावा घेण्याची विनंती केली. त्यांच्या आवाहनाला पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी विविध ठिकाणच्या २५ प्रतिथयश कंपन्यांनी प्रतिसाद दिला आणि तब्बल सव्वासहाशे पदांच्या भरतीसाठी मंगळवारी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यातून ५१० सुशिक्षीत बेरोजगार तरुणांची कंपन्यांमध्ये विविध 
पदांवर निवड झाली आहे. 

कदाचित निवड झालेल्यांच्या हाताला कामच मिळाले नसते तर यातील कोणी एखाद्याने भविष्यात चुकीचे कामही केले असते. मात्र, जी. श्रीधर यांनी तरुणांची हातून गुन्हा घडण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा चंग बांधला आहे. एक पोलिस अधिकारी म्हणून गुन्हेगारी रोखणे एवढे कर्तव्य पार पाडण्याऐवजी ती चौकट ओलांडून जी. श्रीधर यांनी नवाच पायंडा तर पाडला आहे.

नेते फॉर्म्युला राबविणार का
जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग उभारणीची घोषणा विधानसभा  निवडणुकीच्या प्रचार शुभारंभावेळी भाजप नेत्यांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने केली होती. मात्र, चार वर्षांच्या काळात अद्याप एकही उद्योग उभारला गेला नाही. जर, बाहेर जिल्ह्यातील अधिकारी बीडच्या तरुणांना नोकऱ्यांची दारे उघडून देण्यासाठी झटत असेल तर जिल्ह्यातल्या नेत्यांनीही उद्योग उभारणीबरोबरच अशा प्रकारे रोजगार मेळावे भरुन नोकरी व रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख