पाथर्डीच्या प्रताप काकांना खासदार गांधींची अॅलर्जी

एकलव्य शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ता. २५ रोजी दिवंगत माजी आमदार माधवराव निऱहाळी यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच बबनराव ढाकणे यांचा गौरव सोहळा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका तालुक्यात व जिल्ह्यात वाटप करण्याचे काम सुरू आहे. या निमंत्रण पत्रिकेत खासदार दिलीप गांधी यांचे नांव मात्र नाही.
पाथर्डीच्या प्रताप काकांना खासदार गांधींची अॅलर्जी

नगर : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा गौरव सोहळा ता. २५ मार्च रोजी पाथर्डी येथे धुमधडाक्यात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमास उपस्थित राहतील. कार्यक्रम पत्रिका वाटप करण्याचे काम जोरात सुरू आहे. पण तशीच जोरात चर्चा पत्रिकेतील नावावरूनही सुरू झाली आहे. या पत्रिकेत सर्वपक्षीय आमदार, खासदार, माजी खासदारांची नावे आहेत, मात्र विद्यमान खासदार असलेले दिलीप गांधी यांचेच नाव नाही. त्यामुळे आपल्याच मतदारसंघात आपल्याच पक्षाचे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास जाण्याचे खासदार गांधी कसे टाळणार, असा सवाल चर्चिला जात आहे.

सर्वपक्षीय कार्यक्रम
एकलव्य शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ता. २५ रोजी दिवंगत माजी आमदार माधवराव निऱहाळी यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच बबनराव ढाकणे यांचा गौरव सोहळा होत आहे. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. हा सोहळा सर्वपक्षीय व्हावा, ढाकणे यांच्या जुन्या काळातील सर्व सहकाऱ्यांना, मित्रांना त्यात सहभागी होता यावे, म्हणून सर्वपक्षीय सोहळा ठेवण्यात आला. ढाकणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच या सोहळ्याचे साक्षीदार होता येईल, असा भव्य-दिव्य कार्यक्रम करण्याचे नियोजन त्यांचे पूत्र एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका तालुक्यात व जिल्ह्यात वाटप करण्याचे काम सुरू आहे. प्रमुख गावांत प्रताप ढाकणे स्वतः बैठका घेऊन नियोजन करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेत आहेत. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढील राजकारणाचा पाया भक्कम करण्याची ही तयारी असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

खासदार गांधी यांना टाळले
निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नावे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंवर्धनमंत्री प्रा. राम शिंदे या भाजपच्या नेत्यांची नावे पत्रिकेत आहेत. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी खासदार यशवंतराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांना पत्रिकेत वरचे स्थान आहे. याबरोबरच उपस्थितीमध्ये काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार सुधीर तांबे तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार, ज्येष्ठ नेत्यांची नावे आहेत.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे तसेच भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची नावे आहेत. शिवसेनेचे आमदार विजय औटी, माजी आमदार अनिल राठोड तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नावे आवर्जुन घेतली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार वैभव पिचड, आमदार राहुल जगताप यांच्याबरोबरच जिल्ह्यातील महत्त्वाच्या सर्वच नेत्यांची नावे पत्रिकेत आहेत. याबरोबरच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचीही नावे आवर्जुन घेतली आहेत. विशेष म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह माजी खासदारांची नावेही घेतली आहेत. मग केवळ खासदार दिलीप गांधी यांचेच नाव का टाळले, असा सवाल उपस्थित होत असून, कार्यकर्त्यांमधून याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रताप ढाकणे यांनी मागील निवडणुकीच्या वेळी उमेदवारीच्या कारणावरूनच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला होता. या वेळी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपचे अनेक नेते नाराज झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसपद मिळाले. पण जुन्या भाजपमधील कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध मैत्रीचेच राहिले. भाजपमध्ये सदस्य असले, तरी अनेक कार्यकर्ते ढाकणे हाच पक्ष मानत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या युतीमध्ये हे सर्व कार्यकर्ते ढाकणे यांचे काम करणार आहेत. शिवाय भाजपचे जुने कार्यकर्ते आतून ढाकणे यांनाच मदत करतील, असा होरा त्यांचा असल्याचे समजते. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीमध्ये लोकसभेसाठी दक्षिण (नगर) मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठणकावून सांगितले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला प्रताप ढाकणे हा हक्काचा उमेदवार मिळू शकतो, असे गणित मांडले जात आहे.

पाथर्डी तालुक्यात (कै.) राजीव राजळे यांच्यानंतर भक्कम नेतृत्त्व म्हणून प्रताप ढाकणे यांच्याकडे पाहिले जाते. 'विखे पॅटर्न'ने डाॅ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी लोकसभेला काही गडबड केली, तर ढाकणे यांचा पाथर्डी विधानसभा मतदारसंघात लढण्याचा निर्णय होऊ शकेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

प्रतापकाका तुम्ही लढाच
प्रतापराव ढाकणे यांना काका या नावाने ओळखले जाते. सध्या निमंत्रण पत्रिका घेऊन ढाकणे स्वतः गावोगावी बैठका घेत आहेत. तेथे लोकांना आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवर्जुन निमंत्रण दिले जात आहे. या वेळी कार्यकर्ते त्यांना आगामी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीस लढण्याचा आग्रह करीत आहेत. बालमटाकळी येथे झालेल्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी ढाकणे यांना खूपच आग्रह धरला. 'काका तुम्ही किती दिवस दुसऱ्यासाठी संघर्ष करायचा, ते थांबवा आणि आगामी निवडणुकीत लढा. तुम्ही ज्या- ज्या वेळी आदेश दिला, त्यावेळी आम्ही आदेशाचे पालन करून नको असणाऱ्या व्यक्तिंना पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेला प्रामाणिकपणे मदत केली. पण नंतर मात्र त्यातील काहींनी तुम्हालाच विरोध केला. आता पुरे झाले. तुम्हीच उमेदवार हवे आहात,' असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. कार्यकर्त्यांसमोर बोलताना ढाकणे मात्र भावूक होऊन योग्य वेळी निर्णय घेऊ, असा सांगत आहेत. यातच कार्यकर्त्यांना उत्तरही मिळत आहे.

खासदार गांधी उपस्थित राहणार का
छिंदम प्रकरणामुळे खासदार दिलीप गांधी यांच्यावरही ताशेरे ओढत इतर पक्षातील नेत्यांनी त्यांना धारेवर धरले. छिंदम हा गांधी यांचाच समर्थक होता, असे म्हणून गांधी यांच्यावरही रोष व्यक्त होत होता. त्यानंतर फोर्ड कंपनीच्या गाडी खरेदी प्रकरणावरून गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या दोन प्रकरणामुळे गांधी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री आपल्याच नगर लोकसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यात येत आहेत. अशा परिस्थितीत कार्यक्रमास जाणे टाळणे शक्य नाही. पण पत्रिकेत नाव नसल्याने कार्यक्रमाला जाणे योग्यही नाही, अशा कात्रीत खासदार गांधी सापडले असल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. त्यामुळे खासदार गांधी या कार्यक्रमाला जाणार का, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com