बुलडाणा जिल्ह्यातील युवा नेत्यांवर प्रदेशाची धुरा - Marathi Political News Buldana Ravikant Tupkar Ashok Sonone | Politics Marathi News - Sarkarnama

बुलडाणा जिल्ह्यातील युवा नेत्यांवर प्रदेशाची धुरा

अरूण जैन 
शनिवार, 14 एप्रिल 2018

भारिप बहुजन महासंघाने खामगावचे अशोक सोनोने व स्वाभिमानी पक्षाने रविकांत तुपकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिल्याने जिल्ह्यातील युवा राजकीय नेतृत्वाचा एकप्रकारे गौरवच केला आहे. त्याचबरोबर आगामी 2019 च्या निवडणुकीत पक्षाला भक्कम स्थितीत आणण्याची जबाबदारीदेखील या दोघांना पेलावी लागणार आहे.

 बुलडाणा : भारिप बहुजन महासंघाने खामगावचे अशोक सोनोने व स्वाभिमानी पक्षाने रविकांत तुपकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिल्याने जिल्ह्यातील युवा राजकीय नेतृत्वाचा एकप्रकारे गौरवच केला आहे. त्याचबरोबर आगामी 2019 च्या निवडणुकीत पक्षाला भक्कम स्थितीत आणण्याची जबाबदारीदेखील या दोघांना पेलावी लागणार आहे.

अशोक सोनोने यांचे घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदूरा, संग्रामपूर, जळगाव जामोद भागात चांगले प्रस्थ आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारिप बहुजन महासंघाने या भागात तळागाळातील जनतेला आपलेसे केले आहे. मतविभाजनामुळे त्यांना किंवा प्रसेनजित पाटलांना विधानसभा गाठता आली नसली, तरी इतर प्रस्थापित पक्षांच्या नाकी नऊ आणण्याची किमया त्यांनी केली आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदी काम करताना रविकांत तुपकर यांनी प्रभावी वक्तृत्व आणि आंदोलक नेतृत्वाच्या जोरावर विदर्भभर संघटनेचा झेंडा फडकावला. शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नावर रान उठवून त्यांनी प्रसंगी शासनाला व प्रशासनाला जेरीस आणले. मध्यंतरी सदाभाऊ खोत संघटनेतून फुटून सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून दुस-या क्रमांकाचे नेते म्हणून तुपकरांनी धुरा सांभाळत अख्खा महाराष्ट्र पालथा घालून सदाभाऊंची उणीव भरून काढली. त्यामुळे परवा पुण्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बसविण्यात आले. 

त्यांना माढा किंवा बुलडाण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची पक्षप्रमुख खासदार राजू शेट्टी यांची तयारी दिसते. अर्थात जिल्ह्यातील आपापल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनलेले हे दोन्ही नेते काय करतात हे अॅड. प्रकाश आंबेडकर व खासदार शेट्टींना 2019 मध्येच कळणार आहे. मात्र, स्वत:ची राजकीय सोय आणि पक्षाला न्याय अशा दोन्ही जबाबदारी या दोन्ही नेत्यांना एकाचवेळी पार पाडाव्या लागणार आहेत, एवढे निश्चित!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख