उदयनराजे शरद पवारांची पाठ सोडेनात

खासदार उदयनराजे भोसले यांनी २००९ मध्ये कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीतमध्ये प्रवेश केला. त्यावेळपासून त्यांनी खासदार शरद पवार यांची साथ धरली. ते आता भाजपमधून राज्यसभेवर निवडून गेलेले असले तरी राज्यसभेवर जाणाऱ्या सात जणांमध्ये शरद पवारांसोबत उदयनराजे भोसले हेही आहेत
Udayanraje also Elected on Rajya Sabha Along with Sharad Pawar
Udayanraje also Elected on Rajya Sabha Along with Sharad Pawar

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी २००९ मध्ये कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीतमध्ये प्रवेश केला. त्यावेळपासून त्यांनी खासदार शरद पवार यांची साथ धरली. ते आता भाजपमधून राज्यसभेवर निवडून गेलेले असले तरी राज्यसभेवर जाणाऱ्या सात जणांमध्ये शरद पवारांसोबत उदयनराजे भोसले हेही आहेत. पक्ष कोणताही असू देत उदयनराजे मात्र, शरद पवारांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे.

उदयनराजे भोसले हे आजपर्यंत कोणत्याच पक्षाच्या चौकटीत राहून काम करू शकलेले नाही. त्यांची स्वत:ची काम करण्याची वेगळी पध्दत असून त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे ते तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. थेट लोकांत मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे हा त्यांचा गुण सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजतो. २००८-०९मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी उदयनराजेंनी सातारकर जनतेचा कौल आजमविला होता. त्यानंतरच त्यांनी प्रवेश केला. पण त्यांचे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी फारसे जमले नाही. त्यांनी सातत्याने सिंचन, जलसंपदा, सहकार या विभागातील भ्रष्टाचारावर त्यांनी सातत्याने थेट टिकेची झोड उठविली. 

ही टिका अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीतील नेत्यांवरच होती. त्यातूनच २०१४ मध्ये जिल्ह्यातील सर्व आमदारांचा विरोध असूनही शरद पवार यांनी दुसऱ्यांदा लोकसभेचे तिकिट त्यांना दिले. त्यानंतरही उदयनराजे व राष्ट्रवादीतील काही नेते यांच्यात मतभेद राहिले. उदयनराजे थेट पवार साहेबांशी संबंध ठेऊन असतात, असा चिमटाही साताऱ्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांनी काढला होता. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा विरोध असूनही खासदार शरद पवार यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत उदयनराजेंना साथ दिली. एका कार्यक्रमात व्यासपीठावर जाऊन उदयनराजेंनी शरद पवारांचा हात आपल्या डोक्‍यावर ठेऊन असाच तुमचा हात व आशिर्वाद माझ्या डोक्‍यावर राहू देत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. 

केवळ शरद पवारांनी साथ दिल्याने उदयनराजे दुसऱ्यांदा निवडुन आले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी बंड पुकारले. उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर सर्व आमदारांनी बहिष्कार टाकला पण स्वत: शरद पवार उपस्थित राहिले. याच लोकसभा निवडणुकीवेळी कऱ्हाडातील सभेत उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलचे ही शरद पवार यांनी कौतुक करताना त्यांची कॉलर स्वतः हाताने उडविली होती. शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांची दहा वर्षात इतकी राजकिय केमिस्ट्री जुळली होती, की जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या डोळ्यात ती खुपत होती. 

राजकारणातील वाऱ्याची दिशा सहजपणे जाणणारे शरद पवार यांनी कायम उदयनराजेंना साथ दिली. पक्षातील आमदारांसह सर्वांचा विरोध असूनही दोन वेळा त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. केवळ शरद पवारांच्या शब्दाखातर सर्व आमदारांनी उदयनराजेंना साथ दिली. पण त्यावेळी केंद्रात पुन्हा मोदींचे सरकार सत्तेवर आले. सत्तेसोबत राहिल्यास विकास कामे चांगल्या प्रकारे करू शकतो, हा उद्देश ठेऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजेंनी राजकारणाचा शॉर्टकट अजमविण्याच्या नादात भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याविषयी शरद पवारांच्याही मनात कटूता आली. शेवटी सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या भर पावसातील सभेत शरद पवारांनी आपली चूक मान्य करीत ही चूक दुरूस्त करण्याची विनंती समस्त साताकरांना केली. सातारकरांनीही ती दुरस्त केली. अन्‌ उदयनराजेंचा शॉर्टकट फसला. आता भाजपसोबत असले तरी राज्यसभेवर ते बिनविरोध निवडुन जाताना त्यांच्यासोबत शरद पवार हेही बिनविरोध निवडुन जात आहेत. त्यामुळे २००९ पासून उदयनराजेंनी शरद पवारांची पाठ धरली आहे, ती आज २०२० मध्ये ही सोडलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com