विदर्भात घुमणार अल्पेश ठाकोरचा आवाज : ओबीसी महाहुंकार परिषदेला हजेरी लावणार

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आयोजित ओबीसी महाहुंकार परिषदेला अल्पेश ठाकोर प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. गुजरातमध्ये ओबीसींचे नेते म्हणून अल्पेश ठाकोर समोर आले. त्यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसचे आमदार म्हणून गुजरातमध्ये निवडून आलेले आहेत. या विजयामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओबीसींचे नेते म्हणून दखल घेतली गेली.
विदर्भात घुमणार अल्पेश ठाकोरचा आवाज : ओबीसी महाहुंकार परिषदेला हजेरी लावणार

नागपूर : गुजरातमध्ये ओबीसीचे नेते म्हणून पुढे आलेले अल्पेश ठाकोर येत्या 17 मार्चला नागपुरात ओबीसी महाहुंकार परिषदेला हजेरी लावणार आहेत. यामुळे विदर्भातही ओबीसींचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आयोजित ओबीसी महाहुंकार परिषदेला अल्पेश ठाकोर प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. गुजरातमध्ये ओबीसींचे नेते म्हणून अल्पेश ठाकोर समोर आले. त्यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसचे आमदार म्हणून गुजरातमध्ये निवडून आलेले आहेत. या विजयामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओबीसींचे नेते म्हणून दखल घेतली गेली. 

विदर्भातही राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसींचे संघटन करीत आहे. यात सर्व पक्षाचे नेते सहभागी आहेत. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य बबनराव तायवाडे व भाजपचे नेते व माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात ही संघटना गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. 'क्रिमीलेयर'ची मर्यादा वाढविण्यासाठी या संघटनेने दिल्लीतही आंदोलन केले होते. नागपुरातील पूर्व व दक्षिण नागपूर या विधानसभा मतदारसंघातील ओबीसी कार्यकर्त्यांना अल्पेश ठाकोर प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. अल्पेश ठाकोर यांच्या या दौऱ्याचा ओबीसींचे संघटन मजबूत करण्यासाठी किती फायदा होईल, हे दौऱ्यानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु अल्पेश ठाकोर यांना राष्ट्रीय पातळीवर ओबीसी नेता म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून होणार असल्याचे बोलले जात आहे. 

अल्पेश ठाकोर हे ओबीसी तरुणांसाठी एक रोल मॉडेल आहेत, त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी संधी ओबीसी कार्यकर्त्यांना मिळावी, यासाठी ही परिषद आयोजित केल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com