marathawada and bjp | Sarkarnama

मराठवाड्यात भाजपची स्वबळाची तयारी सुरू, लोकसभेसाठी विस्तारकांच्या नियुक्‍त्या

जगदीश पानसरे
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबईतील मातोश्री भेटीनंतरही शिवसेनेच्या भूमिकेत फारसा फरक पडलेला नाही. केंद्रातील एनडीए सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळीही बहिष्कार टाकत शिवसेनेने आपले इरादे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू करत मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लोकसभा विस्तारक प्रमुखांच्या नियुकत्या केल्या आहेत. 

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबईतील मातोश्री भेटीनंतरही शिवसेनेच्या भूमिकेत फारसा फरक पडलेला नाही. केंद्रातील एनडीए सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळीही बहिष्कार टाकत शिवसेनेने आपले इरादे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू करत मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लोकसभा विस्तारक प्रमुखांच्या नियुकत्या केल्या आहेत. 

गेल्या आठवड्यातील आपल्या मुंबई दौऱ्यात अमित शहा यांनी विधानसभा निहाय नियुक्त केलेल्या विस्तारकांची व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत "स्वबळाच्या तयारीला लागा, युतीचे आम्ही बघून घेऊ' असे सूचक विधान केले होते. त्यानंतर काही दिवसांतच राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी विस्तार प्रमुख नेमण्याची प्रक्रिया झपाट्याने पार पाडण्यात आली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या आठही लोकसभा मतदारसंघासाठीचे विस्तार प्रमुख नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात पक्षाकडून मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय विस्तारकांच्या नेमणुका यापुर्वीच केल्या आहेत. त्यात आता लोकसभा विस्तारकांची भर पडली असून भाजपने आतापासूनच स्वबळाची जोरदार तयारी केली आहे. 

हे आहेत मराठवाड्यातील विस्तार प्रमुख... 
भाजपने मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष्य केंद्रित केले असले तरी जिथे सध्या शिवसेनेचे खासदार आहेत त्या जागा कुठल्याही परिस्थीतीत जिंकायच्याच असा निर्धार केला आहे. त्यामुळे विस्तार प्रमुखांची निवड करतांना चर्चेत नसलेले, राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाशी संबंधित असलेल्या नावांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांची विस्तार प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघासाठी औरंगाबाद महापालिकेतील माजी नगरसेवक महेश माळवदकर यांची निवड झाली आहे. 

परभणीसाठी आशिष बाजपेयी, बीडमध्ये हिंदुलाल काकडे तर लातूरमध्ये सिध्देश्‍वर पवार, हिंगोलीत माधवराव पाटील उंचेकर आणि नांदेडचे विस्तार प्रमुख म्हणून रविंद्र पुतगंटीवार यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे ही सगळी नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असल्याचे बोलले जाते. यातील बरीच नावे तर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना देखील धक्का देणारी ठरली आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या विस्तार प्रमुखांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख