Maratha workers asking other MLAs about their resignation | Sarkarnama

जाधवांनी दिला ..तुम्ही कधी राजीनामा देणार ?इतर आमदारांनाही फोन... 

जगदीश पानसरे 
बुधवार, 25 जुलै 2018

कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता जिल्ह्यातील इतर आमदारांना "तुम्ही कधी राजीनामा देणार' अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. 

औरंगाबादः कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता जिल्ह्यातील इतर आमदारांना "तुम्ही कधी राजीनामा देणार' अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. 

मराठा आरक्षणाचा अद्यादेश न काढल्यास राजीनामा देण्याचा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी दिला होता. आज डेडलाईन संपताच त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे मेलवर पाठवून दिला. हर्षवर्धन जाधव यांच्या या राजीनामास्त्रामुळे जिल्ह्यातील इतर राजकीय पक्षांच्या आमदारांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला, आता तुम्ही कधी राजीनामा देणार असे फोन आंदोलक आणि मराठा समाजाचे तरूण जिल्ह्यातील आमदारांना करत आहेत. वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना असाच फोन करण्यात आला. त्याची ऑडिओ टेप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. 

मराठा आमदार म्हणून तुमची भूमिका काय ?
या  ऑडिओ टेपमधील संभाषणाचा तपशील असा , 
आमदार चिकटगांवकर यांना फोनवरून एका व्यक्तीने आपण मृत काकासाहेब शिंदे यांच्या कानडगांव येथून बोलत असल्याचे सांगत संवाद साधला. हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे, तेव्हा मराठा आमदार म्हणून तुमची भूमिका काय? राजीनामा देणार का? अशी विचारणा केली. 

हर्षवर्धन जाधव यांचा पक्ष वेगळा आहे, मला ज्या पक्षाने तिकीट दिले त्यांना एक शब्द तर मला विचारू द्या, आमचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना विचारू द्या. त्यांनी सांगितले तर राजीनामा देईन असे चिकटगांवकर यांनी सांगितले. यावर फोन करणाऱ्या तरूणाने तुम्हाला पक्षाने फक्त तिकीट दिले, मराठा समाजाने निवडून  दिले आहे. तेव्हा पक्षाचे सांगू नका, मराठा आमदार म्हणून तुम्ही राजीनामा देणार आहात का? अशी विचारणा पुन्हा केली. 

यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणा विषयीची भूमिका मांडली आहे. आम्हीही नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्‍नावर आवाज उठवल्याचे सांगत आमदार चिकटगांवकर यांनी फोन करणाऱ्या तरूणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

पण त्याचे समाधान झाले नाही आणि, तो मराठा आमदार म्हणून तुम्ही राजीनामा देणार का? या आपल्या मागणीवर अडून राहिला. अखेर हर्षवर्धन जाधव काय करतात ते पाहू द्या, त्यांनी राजीनामा दिला तर मी ही राजीनामा देईन असे सांगत आमदार चिकटगांवकर यांनी आपली सुटका करून घेतली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख