खासदार डॉ. हीना गावितांकडून  "ऍट्रॉसिटी'सह पदाचा गैरवापर ः मराठा संघटनांचा आरोप

खासदार डॉ. हीना गावितांकडून  "ऍट्रॉसिटी'सह पदाचा गैरवापर ः मराठा संघटनांचा आरोप

धुळे : आरक्षणप्रश्नी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे 18 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात 16 व्या दिवशी रविवारी अतिउत्साही आंदोलकांकडून भाजपच्या संसदरत्न खासदार डॉ. हीना गावित यांच्या कारची तोडफोड झाली. त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यांच्याकडून ठार मारण्यासंबंधी खोटा गुन्हा दाखल होतानाच "ऍट्रॉसिटी'चाही गैरवापर झाला. या प्रकाराचा निषेध, धिक्कार करत असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी पत्रकार परिषदेत मांडली. 

क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी खासदार डॉ. गावित यांच्या संसदेतील भाषणासह भूमिकेवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले की आरक्षणाचा लाभ घेत आणि ऐश्‍वर्यसंपन्न कुटुंबातील गावित परिवाराने मंत्रिपद, आमदारकी, खासदारकी मिळविली. आजोबांपासून आई- वडिलांपर्यंत आणि स्वतःही खासदार गावित यांनी राजकीय लाभ मिळविला. मात्र, शिक्षण, नोकरीसाठी आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाचा लढा त्यांना समजू नये, याचे वैषम्य वाटते.

औरंगाबादला खासदार चंद्रकांत खैरे यांनी आंदोलकांचा रोष पत्करूनही आंदोलनाच्या भावना जाणून घेत शिंदे परिवाराला मदत केली. हा आदर्श समोर ठेवण्याऐवजी, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आरक्षणप्रश्‍नी बलिदान देणाऱ्यांच्या नामफलकापुढे श्रद्धांजलीसाठी खासदार डॉ. गावित येऊ शकल्या नाहीत, त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला.

दबावामुळे गावितांकडून खोटा गुन्हा 

जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस आणि आंदोलकांमधील रेटारेटीनंतर काही अतिउत्साही आंदोलक त्यांच्या कारच्या छतावर चढले. त्यात कारचे नुकसान झाले. तोपर्यंत कारमध्ये खासदार डॉ. गावित असल्याचे कुणालाही ठाऊक नव्हते. जेव्हा ते कळले तेव्हा आंदोलक मागे हटले. त्यामुळे लक्ष्य करून किंवा जाणीवपूर्वक, आदिवासी महिला म्हणून आंदोलकांनी हा प्रकार केलेला नाही. आंदोलकांनी कुठलाही अपशब्द डॉ. गावित यांना उद्देशून वापरला नाही. त्याचवेळी या घटनेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केल्याने सायंकाळी सातपर्यंत डॉ. गावित यांनी सामंजस्याची भूमिका घेत कारवाईसंदर्भात कुठलीही पावले उचलली नव्हती. मात्र, मराठा व आदिवासी समाजात दुही निर्माण व्हावी, मराठा समाजाचे आंदोलन चिरडले जावे म्हणून विकृत मनोवृत्तीच्या काही राजकीय नेत्यांनी दबाव आणल्यानंतर खासदार डॉ. गावित यांची भूमिका बदलली आणि त्यांच्याकडून आंदोलकांकडून मला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यासह ऍट्रॉसिटीचा आधार घेत खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप आहे. 

बुधवारी अटक करून घेणार 

या प्रकरणी चार आंदोलकांना अटक झाली आहे. पोलिसांनी संशयितांत जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सचिव निंबा मराठे, नाना कदम यांच्यासह आणखी 14 जणांची नावे घेतली आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी साडेआठला 14 आंदोलक शहर पोलिस ठाण्यात स्वतःला अटक करून घेतील. तरीही सनदशीर मार्गाने पुढे आंदोलन सुरू राहणार असून, पुढील निर्णयानुसार नऊ ऑगस्टला जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जाईल, असे जिल्हाध्यक्ष मोरे म्हणाले. 

भ्रष्टाचारावर संसदेत बोलणार का? 

धुळ्यातील घटनेला राजकीय रंग दिला जात असून, संसदरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या खासदार डॉ. गावित यांनी भांडवल करत मराठा आंदोलकांवर कठोर कारवाईसाठी संसदेत आवाज उठविला. मात्र, त्यांनी राईनपाडा (ता. साक्री) येथे नाथपंथी डवरी समाजाच्या पाच भिक्षुकांना जमावाने क्रूरतेने ठार मारल्यानंतर पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी संसदेत आवाज उठविला नाही. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचारातून आदिवासींच्या लाभाचा घास हिरवला जात असताना त्याविषयी खासदार डॉ. गावित यांनी संसदेत आवाज उठविल्याचे दिसून आले नाही. उलट अशा गैरप्रकारांत त्यांचे वडील माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे हात बरबटलेले असल्याने बचावासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे.

पाठोपाठ त्यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांनीही भाजपकडून खासदारकी मिळविली. त्यामुळे त्या लाभापासून वंचित आदिवासींच्या न्यायासाठी त्या संसदेत का बोलतील? त्यांना राजकारणाचा पुळका असेल तर त्यांनी अशा भ्रष्टाचाराविषयी गायकवाड अहवालानुसार दोषींवर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष मोरे यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com