मराठा आरक्षणावरून विधानसभेत गोंधळ 

विरोधकांनी आज विधानसभेत गोंधळा घातला. या गोंधळामुळे प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही.
Nagpur-Vidhansabha-bhavan
Nagpur-Vidhansabha-bhavan

नागपूर :  मराठा आरक्षणावरून राज्य सरकार जनतेला मूर्ख बनवित आहे. या सरकारने समितीपुढे काहीही केलेले नाही, असा आरोप करीत विरोधकांनी आज विधानसभेत गोंधळा घातला. या गोंधळामुळे प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला नाही. 

प्रश्‍नोत्तराचा तास सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मराठा आरक्षणावरून सरकार केवळ पोकळ आश्‍वासने देत आहे. याच मुद्यावरून परळी येथे मराठा आंदोलकाचा मोठा मोर्चा झाला आहे. यामुळे आजचे कामकाज बाजूला सारून मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

या स्थगन प्रस्तावाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, आतापर्यंत शांतपणे मोर्चे निघाले परंतु आता आंदोलकांचा अंत पाहू नका. आंदोलकांमध्ये अत्यंत नाराजी असून या नाराजीचे रुपांतर हिंसेत होण्यास वेळ लागणार नाही. मग याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहील, असा इशारा पवार यांनी दिला. 

राज्य सरकार या मुद्यावर समितीपुढे सरकले नसल्याचे सांगून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणावर समिती स्थापन केली आहे. या समितीपुढे सरकार सरकली नाही. लोकांना मूर्ख बनविण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणा देऊ लागले.

 या गोंधळातच भाजपचे आशीष शेलार यांनी मराठा आरक्षण कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे मिळू शकले नसल्याचा आरोप केला. यामुळे गोंधळ पुन्हा वाढला. शेलार यांना बोलू देऊ नका, असा आग्रह विरोधक करीत होते. विरोधकांचा ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. 

 महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची यादी  या गोंधळातच वाचून दाखविली. या उत्तरानेही विरोधकांचे समाधान न झाल्याने पहिल्यांदा 10 मिनिटांसाठी व नंतर प्रश्‍नोत्तराचा तास संपेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com