Maratha Morcha Activists courted Arrest in Dhule | Sarkarnama

धुळे मराठा क्रांती मोर्चाचे  16 आंदोलक स्वतःहून अटकेत :  गुन्हा सिद्ध करण्याचे डॉ. हीना गावितांना आव्हान 

निखिल सूर्यवंशी 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (पाच ऑगस्ट) नियोजन मंडळाची बैठक होती. त्याचदिवशी पूर्वनियोजनाप्रमाणे सहकुटुंब शेकडो आंदोलक मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी ठिय्या आंदोलन करीत होते. बैठकीनंतर खासदार गावित कारने बाहेर पडल्या. त्यावेळी प्रवेशव्दारावर त्यांची कार काही तरुण आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह पोलिसांच्या रेटारेटीत काही आंदोलक खासदार गावित यांच्या कारच्या टपावर चढले व घोषणाबाजी करीत नाचले.

धुळे : नंदुरबार मतदारसंघातील भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावरील हल्ला प्रकरणी पोलिसांकडून फरार दाखविण्यात आलेले धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे 18 पैकी 16 आंदोलक आज (बुधवारी) सकाळी शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. खासदारांची फिर्याद आणि वाढीव कलमान्वये सोमवारी एकूण 22 आंदोलकांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न, 'ऍट्रॉसिटी'सह दंगल घडवून आणण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

उर्वरित दोन आंदोलक ऋषीकेश पाटील, प्रदीप जाधव हे बाहेरगावाहून परतल्यावर पोलिस ठाण्यात हजर होतील. तत्पूर्वी, दिनेश ओमप्रकाश आटोळे, अमोल हनुमंत मराठे, अमोल रामदास मराठे, कुणाल पवार या चार संशयित आंदोलकांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस ठाण्यात आज संशयित क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, नानासाहेब कदम, बापू मराठे, सचिन मराठे, आबासाहेब कदम, रवींद्र शिंदे, उल्हास यादव, अजित घाडगे, अरुण पवार, हेमंत भडक, रजनीश निंबाळकर, निंबा पाटील, अर्जुन पाटील, राजू महाराज मराठे, संदीप विनायक शिंदे, सुयोग मोरे हे आंदोलक स्वतःहून हजर झाल्यावर त्यांना अटक झाली. 

खासदारांनी दिली फिर्याद
जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (पाच ऑगस्ट) नियोजन मंडळाची बैठक होती. त्याचदिवशी पूर्वनियोजनाप्रमाणे सहकुटुंब शेकडो आंदोलक मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी ठिय्या आंदोलन करीत होते. बैठकीनंतर खासदार गावित कारने बाहेर पडल्या. त्यावेळी प्रवेशव्दारावर त्यांची कार काही तरुण आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह पोलिसांच्या रेटारेटीत काही आंदोलक खासदार गावित यांच्या कारच्या टपावर चढले व घोषणाबाजी करीत नाचले. त्यात कारचे नुकसान झाले. त्यामुळे खासदार गावित यांच्या फिर्यादीनुसार वीस ते पंचवीस आंदोलकांविरूध्द गुन्हा दाखल झाला. 

क्रांती मोर्चाची भूमिका
अतिउत्साही आंदोलकांकडून हे कृत्य झाले. ते निंदनीय असून या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करीत आहोत. आंदोलकांना कारमध्ये खासदार गावित असल्याचे माहीत नव्हते. त्यांना कुठलाही अपशब्द वापरण्यात आला नाही की धक्काबुक्की, हल्ल्याचा प्रयत्न झालेला नाही. कारमध्ये त्या आहेत हे बऱ्याच वेळानंतर समजले. असे असताना खासदार गावित यांनी पदाचा गैरवापर करीत खोटा गुन्हा दाखल केला. तो त्यांनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेसह आरोपांनुसार सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान आहे. तसे झाल्यास जिल्हा क्रांती मोर्चाचे संबंधित पदाधिकारी मोर्चासह आपापल्या पक्ष, संघटनांना सोडचिठ्ठी देतील, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष मनोज मोरे व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख