maratha mahasangh supports vijay shivtare | Sarkarnama

मराठा समाज विजय शिवतारे यांच्या पाठिशी : वांढेकर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सासवड : पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात मराठा समाज युती व विजय शिवतारे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत वांढेकर यांनी केले आहे.

सासवड : पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात मराठा समाज युती व विजय शिवतारे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत वांढेकर यांनी केले आहे.

मराठा समाजाला ७० वर्ष कॉंग्रेस व नंतर राष्ट्रवादीनेही आरक्षण न देता केवळ वापरून घेतले आणि समाजाचे आर्थिक शोषण केले. मात्र शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप या महायुतीने मराठ्यांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. पुरंदर तालुक्याचे आमदार आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मराठ्यांना आरक्षण देण्यात महत्वाची भूमिका बजावली. याउलट तालुक्यातील इतर पक्षांनी केवळ हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप वांढेकर यांनी केला.

 श्री. वांढेकर म्हणाले, मराठा आंदोलनात समाजातील अनेक युवकांनी बलिदान केले. त्यांचे यात प्रथम श्रेय आहे. पण त्या बरोबरच ७० वर्षानंतर समाजाला न्याय देणाऱ्या या  सरकारचे योगदानही विसरून चालणार नाही. मी समाजातील अनेक कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी चर्चा केलेली असून शिवतारे यांना पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी व समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पाठींबा देण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे.``

शिवतारे यांच्या कार्यकाळात तालुक्यात जेवढी विकासकामे झाली तेवढी या तालुक्यात मागच्या सत्तर वर्षात कधीच झालेली नाहीत. विरोधी पक्षातील लोकसुद्धा या गोष्टी मान्य करतात. केवळ निवडणुका आहेत म्हणून कोणाचे श्रेय नाकारणे योग्य होणार नाही. गावोगावचे सुधारलेले रस्ते, सिमेंट बंधारे, विक्रमी शेततळी, गुंजवणी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय महामार्ग, आरटीओ ऑफिस, क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, जेजुरी रुग्णालय, प्रशासकीय इमारत अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रशांत वांढेकर म्हणाले की राज्यात शिवसेना - भाजपची सत्ता येणार हे निश्चित असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाकडून लोकांची कामे होणे शक्य नाही. त्यातच त्यांचा सगळीकडे प्रकल्पांना विरोध असल्यामुळे तालुका भकास होईल. शिवतारे यांच्या इतकी कामे संजय जगताप करू शकणार नाहीत हे वास्तव आहे. या बाबी लक्षात घेऊन पुरंदर तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रमुख लोकांनी विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतलेला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख