Maratha Kranti Morcha Sanjay Raut Shivena talks about leadership Change | Sarkarnama

#MarathaKrantiMorcha राज्यात हिंसक घटना होतात तेव्हा नेतृत्वबदलाची चर्चा होते : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अस्थिर वातावरण आहे. आज मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी याच मुद्द्यावरुन पुकारलेल्या बंदच्या काळात हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते.

मुंबई - ''राज्य जेव्हा हिंसक घटनांनी वेढले जाते तेव्हा राज्याच्या नेतृत्वबदलाच्या चर्चा होतात, पण त्यात शिवसेनेला पडायचे नाही. कुणी महाराष्ट्र अस्थिर करु नये एवढीच आमची भूमिका आहे," असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'साम टिव्ही'शी बोलताना केले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अस्थिर वातावरण आहे. आज मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी याच मुद्द्यावरुन पुकारलेल्या बंदच्या काळात हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. ते म्हणाले, "या मुद्द्यावरुन राज्यात लाखाचे मोर्चे निघाले. पण एकही दगड पडला नाही. कुणाच्या केसाला धक्का लागला नाही. कालपर्यंत जो समाज शांत होता, तो गेल्या दोन दिवसांत हिंसक का झाला, याचा विचार राज्यकर्त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी करायचा आहे. हे राजकीय नेतृत्त्वाचे अपयश आहे, यात सगळे आले,"

राऊत पुढे म्हणाले, "हे सगळे घडत असताना सरकार कुठेही दिसत नाही. सरकार अदृश्य आहे. अत्यंत केवीलवाणी व भयंकर स्थिती महाराष्ट्रात उद््भवली आहे. अशा प्रकारे एखादे राज्य जेव्हा हिंसेच्या विळख्यात सापडते, तेव्हा नेतृत्व बदलाच्या चर्चा होत असतात. पण आम्हाला त्यात पडायचे नाही. जे अशी चर्चा करत आहेत, मग ते भाजपमधले लोक असोत वा बाहेरचे, त्यांनी या प्रश्नाचे राजकारण करुन आधीच पेटलेला महाराष्ट्र अस्थिर करु नये, ही आमची भूमिका आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख