maratha kranti morcha and chavan | Sarkarnama

नांदेडला अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर मराठा आंदोलकांचा घंटानाद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील आनंद निलयम या निवासस्थानासमोर मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. सात) दुपारी आंदोलन करुन घंटानाद करण्यात आला. यावेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार डी. पी. सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवत आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही देखील आपल्यासोबत आहोत, असे आश्वासन दिले. 

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील आनंद निलयम या निवासस्थानासमोर मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. सात) दुपारी आंदोलन करुन घंटानाद करण्यात आला. यावेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार डी. पी. सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवत आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही देखील आपल्यासोबत आहोत, असे आश्वासन दिले. 

मराठा समाजाच्या आरक्षणाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार अमिता चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन घंटानाद करण्यात आला. यावेळी आमदार अमिता अशोक चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, भाऊराव कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, स्वाभीमानी संघटनेचे प्रल्हाद इंगोले, प्रवक्ते संतोष पांडागळे, संतोष मुळे, निलेश पावडे, विठ्ठल पावडे, विजय येवनकर, भागवत देवसरकर, गजानन सावंत, अविनाश कदम, अविनाश कदम, अवधूत कदम, भगवान कदम, नागारोव भांगे, बालाजी गाडे, धनंजय सुर्यवंशी, संकेत पाटील, सतिश कदम, हणमंत राजेगोरे, शिवाजी पाटील, गजानन इंगोले, मारूती नरंगलकर, श्‍याम टेकाळे आदी उपस्थित होते. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाच्या खासदारांनी लोकसभेत तर आमदारांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत मागण्या मांडाव्यात, कोणत्याही परिस्थितीत सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडावे, मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी या व इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मराठा समाजाच्या समोरील प्रश्न व मागण्या मांडल्या. 

आमदार सावंत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी देखील लोकसभेत मागणी मांडली आहे. त्याचबरोबर आम्ही देखील विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये ही मागणी लाऊन धरली आहे. मात्र भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आश्वासनच देत आहेत. आमदार अमिता चव्हाण म्हणाल्या की, आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही देखील आपल्यासोबत आंदोलनात आहोत. सरकार आणि पोलिस विनाकारण कार्यकर्त्यांची धरपकड करुन कारवाई करत आहेत. आम्ही तुमच्यामुळे निवडून आलो आहोत त्यामुळे आम्ही देखील आरक्षणाच्या मागणीसाठी तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. या आंदोलनामुळे शिवाजीनगर भागात पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. चारही बाजूने रस्ते बॅरीकेट लाऊन अडविण्यात आले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख