मराठा आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली औरंगाबादच्या "मराठा क्रांती मूक मोर्चा' तून

 मराठा आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली औरंगाबादच्या "मराठा क्रांती मूक मोर्चा' तून

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्यकर्त्यांचे होणारे दुर्लक्ष आणि कोपर्डी येथे घडलेल्या घटनेचे निमित्त यातून एक मोठा लढा उभा राहिला. या लढ्याचे केंद्रबिंदू होते औरंगाबाद. औरंगाबादेतूनच पहिला "मराठा क्रांती मूक मोर्चा' निघाला. या मोर्चांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झाली. औरंगाबादेतील क्रांतीचौकातून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे लोण कालांतराने राज्यभरात पसरले. 

मोर्चाबाबतचे सगळे महत्वाचे निर्णय देखील औरंगाबादेतून घेतले गेले. आज मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने केलेला कायदा वैध ठरवला आणि औरंगाबादेतून सुरू झालेल्या एका मोठ्या ऐतिहासिक लढ्याला यश आले. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेने मराठा समाजाच्या संतापाचा कडेलोट झाला होता. तेथील मराठा संघटनांनी रस्त्यावर उतरत घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. शेजारीच असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात कोपर्डी प्रकरणाची धग सर्वात आधी पोहचली आणि समाज इथेही रस्त्यावर उतरला. 

मराठा संघटनांची पहिली छोटेखानी बैठक तीन ऑगस्ट 2016 रोजी पार पडली. त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा दुसरी बैठक झाली. यावेळी समाजातील आमदार, खासदारांची उपस्थितीही होती. बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली आणि नऊ ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबादच्या क्रांती चौकातून पहिला "मराठा क्रांती मूक मोर्चा' निघाला. या मोर्चासाठी वापरलेली पद्धत हेवा वाटावा अशीच होती. शिस्तबद्ध मोर्चासह निर्माण केलेले वेगवेगळे पायंडे नजरेत भरणारे ठरले. लाखोंच्या संख्येने समाज बांधव मोर्चात सहभागी होत होते, पण कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी देखील घेतली जात होती. 

शांततामय मार्गाने, मोर्चा मार्गावर अस्वच्छता होणार नाही, कुणाला त्रास किंवा ईजा होणार नाही याची काळजी मोर्चातील समन्वयक आणि मराठा तरूण घेत होते. पुढे हाच "औरंगाबाद पॅटर्न' राज्यात चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे 58 मोर्चे राज्यभरातून निघाले. एवढेच नाही तर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न विदेशातही पोहचला, तिथेही मोर्चे काढण्यात आले. कुठल्याही राजकीय नेतृत्वाशिवाय निघालेल्या मराठा क्रांती मुक मोर्चाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी दोन महिन्यांनी म्हणजे नऊ ऑक्‍टोबरला पुन्हा राज्यव्यापी बैठक झाली, तीही औरंगाबादेतच. 

महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश येथील मोर्चाचे प्रतिनिधी सहभागी यात सहभागी झाले. याच बैठकीत 14 डिसेंबर 2016 रोजी नागपुरला मोर्चा काढायचे ठरले. याचवेळी मराठा आरक्षणासाठी तज्ज्ञांची राज्य समिती नेमण्यात आली. नागपुर मोर्चाबाबत नेमकेपणाने दिशा ठरवण्यासाठी पुन्हा औरंगाबादेतच छत्रपती कॉलेजमध्ये बैठक घेण्यात आली. औरंगाबादेत "मराठा क्रांती मूक मोर्चा'चे राज्यव्यापी कार्यालय असावे, यावर शिक्‍कामोर्तब झाले. त्याप्रमाणे सर्वांना सोयीचे आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर मुंबईत 31 जानेवारी 2018 ला शेवटचे अस्त्र म्हणून मराठा क्रांती मूक मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला. त्याचा निर्णय आणि नियोजन देखील औरंगाबादेतच झाले. आजवरच्या इतिहासात आगळीवेगळी रचना यशस्वीपणे राबविणाऱ्या औरंगाबादेतील मोर्चेकऱ्यांनी एका अर्थाने समाजालाच दिशा देण्याचे काम केल्याच्या प्रतिक्रिया त्यानंतर सर्वत्र उमटायला लागल्या. 

मराठा क्रांती मोर्चाचा घटनाक्रम 

- 9 ऑगस्ट 2016 पहिल्या मराठा क्रांती मुक मोर्चाला सुरवात 
- 31 जानेवारी 2017 राज्यव्यापी चक्‍काजाम आंदोलन 
- 18 सप्टेंबर 2016 नांदेड येथे विराट मुकमोर्चा 
- 3 सप्टेबर 2016 परभणी येथे विराट मुकमोर्चा 
- 23 जुलै 2018 हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचे बलिदान 
- 13 जुलै 2017 कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ लातूर येथे कॅन्डल मार्च 
- 29 जुन 2018 तुळजाभवानी मातेच्या महाव्दारासमोर जागरण -गोंधळ 
- 18 जुलै 2018 परळी वैद्यनाथ येथे राज्यातील पहिला मराठा क्रांती ठोकमोर्चा 
- 19 जुलै 2018 परळीतील ठोकमोर्चाचे लोण राज्यभर पसरले 
- 20 जुलै 2018 औरंगाबादेत ठिय्या आंदोलनास सुरवात 
- 8 ऑगस्ट 2018 महाराष्ट्र बंदची घोषणा 
- 9 ऑगस्ट 2018 कडकडीत महाराष्ट्र बंद 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com