फुलंब्रीत क्रांतिदिनी घडला इतिहास, महामार्ग पहिल्यादाच दिवसभर बंद

फुलंब्रीत क्रांतिदिनी घडला इतिहास, महामार्ग पहिल्यादाच दिवसभर बंद

फुलंब्री : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी फुलंब्री येथे क्रांतीदिनी मराठ्यांनी इतिहासात पहिल्यांदाच औरंगाबाद - जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग दिवसभर बंद ठेऊन एक नवीन इतिहास घडविला आहे. फुलंब्री शहरासह, पालफाटा, खामगाव फाटा व आळंद या चारही ठिकाणी औरंगाबाद- जळगाव महामार्ग दिवसभर चक्काजाम आंदोलन करून पुन्हा एकदा एक नवीन इतिहास घडविला आहे. सुमारे आठ- नऊ तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनात सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी संपूर्ण फुलंब्री तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला. फुलंब्री तालुक्‍यातील फुलंब्री टी पॉईंट, पालफाटा, खामगाव फाटा व आळंद या चार ठिकाणी औरंगाबाद - जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात करण्यात आली. फुलंब्री तालुक्‍यातील बाजार पेठेसह पहिल्यांदाच हा महामार्ग दिवसभर बंद राहिल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरलेला होता. रस्त्यावर केवळ रुग्णवाहिका व पोलिसांची वहानेच धावताना दिसून येत होती. 

फुलंब्री टी पॉईंटवर करण्यात येणाऱ्या आंदोलनात एक भव्य स्टेज उभारून पोवाडा, देशभक्तीपर गीते, भारुडे सादरीकरण करून मराठा समाजात जनजागृती करण्यात आली. तसेच तालुक्‍यातील दुसरे आंदोलनाचे ठिकाण असलेल्या पाल फाट्यावर भजन कीर्तन करण्यात आले. त्यांनतर उपस्थित असलेल्या सकल मराठा समाजातील बांधवांनी मनोगते व्यक्त करून शासनाचा निषेध केला. त्याचबरोबर मराठा समाजाचा अंत न बघता तत्काळ मराठा आरक्षण द्यावे. अशी एकमुखी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. तहसीलदारांना प्रलंबित विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. 
मुस्लिम समाजाकडून फळांचे वाटप 
मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी गेल्या महिन्याभरापासून आंदोलने सुरू आहे. नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी फुलंब्री तालुका कडकडीत बंद ठेऊन औरंगाबाद - जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. याच दरम्यान फुलंब्री येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठींबा देऊन सकाळी चहा, फळांचे, व नाष्टयांचे वाटप करण्यात आले. 
पोलिसांचा मोठा फौजफाटा 
मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने आंदोलनाचा धसका घेऊन पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, राज्य राखीव पोलीस दल (एस.आर.पी.एफ), जिल्हा वाहतूक शाखा, यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, फौजदार गणेश राऊत, विजय जाधव यांच्यासह आदी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com