मराठा आंदोलकांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : शरद पवार

राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा व अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत. मराठा समाजाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे व त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये - शरद पवार
मराठा आंदोलकांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : शरद पवार

बारामती शहर : मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. मात्र, कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने, राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. या विषयासंदर्भात पवार यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

#MarathaReservation

यात ते म्हणतात, ''हिंसा, जाळपोळ, दंगे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजेत. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा व बहुजनांचा पाठिंबा व सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी सर्वांनी घ्यायला हवी. येथे नमूद करणे आवश्यक आहे की राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा व अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत. मराठा समाजाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे व त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये." 

श्री. पवार पुढे म्हणतात, "ज्या शिवरायांचा आदर्श समोर ठेवून हे आंदोलन केले जाते आहे त्या छत्रपतींनी अठरापगड जातींना, बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का लागेल असे आचरण आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे प्रारंभी शांततामय मार्गाने आंदोलनाची समाजातील सदिच्छा गमावणे चांगले लक्षण नाही, हे मी विशेषत्वाने नमूद करु इच्छितो,"

''गोखले अर्थ राज्य शास्त्र संस्थेने शेतकरी आत्महत्या संदर्भात केलेल्या पाहणीत मराठा समाजाबद्दलची विदारक स्थिती मांडण्यात आली आहे. कुटुंबाच्या विस्तारानुसार जमिनीचे लहान तुकडे पडत गेल्याने शेती किफायतशीर राहिली नाही, यातून आलेल्या आर्थिक हलाखीमुळे पुरेसे शिक्षण व नोक-या नाहीत अशा दुष्टचक्रात युवक सापडला आहे. मराठा समाजातील भूमीहिनांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 28 टक्के असून काठावरचे 53 तर अल्पभूधारक 58 टक्के व पाच ते दहा एकर जमिन असलेले 63 टक्के आहेत. साठ टक्के जमिनींना हमखास पाणीपुरवठा नाही, यातून ही समस्या चिघळत गेली आहे. आत्महत्यांचे प्रमाण 46 टक्के आहे हे पूर्वी समोर आलेलेच आहे," असेही श्री. पवार यांनी म्हटले आहे. 

"वर्षानुवर्षाच्या या वंचनेमुळे मराठा समाजात व विशेषतः युवकांच्या मनात राग साठणे नैसर्गिक असले तरी जाळपोळ, दगडफेक करणे किंवा आत्महत्या करणे हा मार्ग नक्कीच नाही.
एखादे आंदोलन सुरु केल्यानंतर कोठे थांबावे याचा विचार करायचा असतो, हा विचार केल्याबद्दल अभिनंदन. या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या तीव्र भावना देशासमोर आल्या आहेत. या मागणीच्या पूर्ततेच्या संदर्भात काही वैधानिक प्रक्रीयेची आवश्यकता आहे. या साठी उचित वेळ आवश्यक आहे. त्या पुढे आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात लागणारा वेळ, राज्य शासन व विधीमंडळ प्रक्रीया आवश्यकआहे, त्यासाठी शांतता हवी आहे. तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोहोचणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योग धंद्यातील गुंतवणूक थांबेल बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल, म्हणून मराठा आंदोलकांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे," असे शरद पवार यांनी शेवटी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com