Maratha community resolves to minimize expenditure in marraiges | Sarkarnama

शहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

 विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एचआयव्हीच्या तपासणीला हरकत नाही. 

* सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे. 

व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे.बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे. (पाच ते सात दिवस)

कोल्हापूर  : बुवाबाजीला थारा नको, घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको, विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ नको, की अनाठायी खर्च नको, असा वज्रनिर्धार करत मराठा आचारसंहिता आचरणात आणण्यासाठी मराठा समाजाने आज एकजुटीचा एल्गार केला.

मराठा स्वराज्य भवन उभारण्याचा संकल्पही येथे करण्यात आला. मराठा संस्कृती टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन मराठा समाजाचा विकास घडवावा, असे आवाहन करण्यात आले. निमित्त होते अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित मराठा आमसभेचे. 

मराठा क्रांती मूक महामोर्चानंतर मराठा समाज एकत्र आला. मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतर मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत चर्चा सुरू राहिली. त्याचबरोबर समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलली गेली. समाजाच्या विकासासाठी नियोजनबद्ध चौकट आखण्याकरिता मराठा आचारसंहितेची गरज स्पष्ट झाली.

मराठा आरक्षण मिळण्यासाठी पुढच्या टप्प्यातील लढाई व मराठा स्वराज्य भवन साकारण्यासाठीचे मुद्देही पुढे आले. हे तिन्ही प्रश्‍न तडीस लागण्यासाठी आमसभेत त्यावर ऊहापोह करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आज आमसभेसाठी जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांतील मराठा समाजातील बांधव शाहू सांस्कृतिक भवनात जमा झाले. 

मराठा आचारसंहिता अशी : 

* समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामीनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी) यांची मनोभावे पूजा व्हावी. या दैवतांमध्ये अनावश्‍यक वाढ होऊ नये. बुवाबाजीला थारा नको. घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको. 

* विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एचआयव्हीच्या तपासणीला हरकत नाही. 

* सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे. 

* व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे. 1) बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे. (पाच ते सात दिवस). 2) एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जित करावी व बाकी रक्षाकुंडात विसर्जित करावी किंवा शेतीमध्ये विसर्जन करून प्रिय व्यक्तीच्या स्मृती जागृत ठेवाव्यात. 

* प्रत्येक गोष्टीची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा करावी. 

* मुलगा-मुलगी भेद नको. दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणे. 

* गावच्या जत्रा, माही पूर्वीप्रमाणे आप्तांपुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भोजनावळी बंदी व्हाव्यात. यामध्ये दारूचा वापर थांबवावा.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख