अंबादास दानवेंची निवडणूक : शिवसेनेच्या उत्कृष्ट नियोजनाचा विजय 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. शिवसेना-भाजप महायुतीचे अंबादास दानवे 524 एवढी विक्रमी मते घेऊन विजयी झाले. अर्थात या विजयात शिवसेनेचे नेते, मंत्री यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचा मोठा वाटा होता हे नाकारून चालणार नाही.
 अंबादास दानवेंची निवडणूक : शिवसेनेच्या उत्कृष्ट नियोजनाचा विजय 

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. शिवसेना-भाजप महायुतीचे अंबादास दानवे 524 एवढी विक्रमी मते घेऊन विजयी झाले. अर्थात या विजयात शिवसेनेचे नेते, मंत्री यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचा मोठा वाटा होता हे नाकारून चालणार नाही. कॉंग्रेसमधून निलंबित केलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्यामुळे आघाडीची जवळपास सव्वाशे मत महायुतीकडे चालून आली ही गोष्ट देखील अंबादास दानवे यांच्या पथ्यावर पडली. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चुरसीची ठरण्याची शक्‍यता कॉंग्रेस-आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्या भूमिकेमुळे फोल ठरली. शिवसेनेचे राजू वैद्य यांच्या निवासस्थानी अंबादास दानवे आणि कुलकर्णी यांनी संयुक्तपणे घोडेबाजार न करण्याचा घेतलेला संकल्प त्याला कारणीभूत ठरला. त्यांची ही आदर्श भूमिका काही आघाडीच्या सदस्यांच्या पचनी पडली नाही. अब्दुल सत्तार यांच्या भेटीतून आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटणार याचा अंदाज आल्याने मग 'मालक' बॅकफुटवर गेले आणि त्यांनी सबुरीची भूमिका घेतली. 

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत होती, तशी आघाडीच्या सदस्यांची चिलबिचल वाढली होती. शेवटच्या दोन दिवसआधी बाबुराव कुलकर्णी यांनी स्वपक्षातील सदस्यांशी संपर्क साधला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सत्तार आणि दानवे यांच्या थेट संपर्कातून आघाडीची निम्मी मत महायुतीकडे वळवण्यात या जोडीला यश आले होते. 

भाजपचे बंड थंड
जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेतील युतीचे कारण पुढे करत भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना बंडाचे स्वरूप येण्याआधीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांनी थंड केले. तरीही जोखीम नको म्हणून शिवसेना नेत्यांनी एमआयएम, अपक्ष आणि काही कॉंग्रेस सदस्यांची जुळवाजुळव करून ठेवली होती. ती किती मोठ्या प्रमाणात होती हे अंबादास दानवे यांना मिळालेल्या 524 मतांवरून स्पष्ट झाले. 

भाजप प्रमाणेच शिवसेनेतील खैरे समर्थक सदस्य वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा सुरू होती. परंतु, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल देसाई यांनी सदस्यांना वेळोवेळी दिलेला 'कानमंत्र' कामाला आला आणि ही केवळ चर्चाच ठरली. त्यामुळे शिवसेना-भाजप महायुती, सत्तार समर्थक, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य, एमआयएम आणि अपक्ष अशा पाचशेहून अधिक सदस्यांचे पाठबळ अंबादास दानवे यांच्या पाठीशी उभे करण्यात युतीच्या नेत्यांना यश आले. 

शिवसेनेला संजीवनी देणारा विजय
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील हा विजय शिवसेनेसाठी संजीवनी देणारा ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका पाहता अंबादास दानवे यांचा विजय महत्वाचा समजला जातो. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वःत या निवडणुकीत लक्ष घातले होते. शिवसेना-भाजप सदस्यांकडून आपल्या उमेदवाराला दगाफटका होऊ नये यासाठी दरम्यानच्या काळात ते रोज नेत्यांच्या संपर्कात असायचे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे या सर्वांवर अंबादास दानवे यांना निवडूण आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. 

एमआयएम, कॉंग्रेस-आघाडी व अपक्षांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे सदस्यांनी देखील आनंदाने आपले मत महायुतीच्या पारड्यात टाकले. एकूण 657 पैकी 647 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

अंबादास दानवे यांना 524, आघाडीचे भवानीदास कुलकर्णी यांना 106, अपक्ष शहनवाज खान यांना 3 मते मिळाली, तर 14 मते बाद ठरली. वैध 633 मतांमधून विजयासाठी 317 मतांचा कोटा होता. दानवे यांनी पहिल्या पंसतीतच तो पुर्ण करत पाच फेऱ्यांमध्ये 524 मते मिळवली. शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा अंबादास दानवे यांचा हा प्रवास भविष्यात पक्षातील नव्या पिढीला दिलासा देणारा ठरणारा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com