रशियात अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीला कोण धावणार? - Many Medical Students Held Up in Russia Due to Corona | Politics Marathi News - Sarkarnama

रशियात अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीला कोण धावणार?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 मार्च 2020

रशियातील किर्गिस्तान येथे मेडिकल कॉलेजमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्यासाठी मागणी करीत आहेत. विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर संपर्क झाला असता महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, धुळे, बुलढाणा, जळगाव, सातारा, सांगली, नागपूर, ठाणे आदि जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आहेत

नाशिक : महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी रशियातील किर्गिस्तान येथील (Osh state University Medical Institute) येथे मेडिकलचे शिक्षण घेत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनी मायदेशी येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना विनंती केली आहे. मात्र, अद्याप कोणतेच आश्‍वासन न मिळाल्याने त्यांचे पालक चिंतेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीला कोण येणार, याची त्यांना प्रतिक्षा आहे.

रशियातील किर्गिस्तान येथे मेडिकल कॉलेजमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्यासाठी मागणी करीत आहेत. विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर संपर्क झाला असता महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, धुळे, बुलढाणा, जळगाव, सातारा, सांगली, नागपूर, ठाणे आदि जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी असून विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचे कुणाल भामरे या विद्यार्थ्याने वडील डॉ. विलास भामरे यांना सांगितले. 

याप्रमाणे डॉ. भामरे यांनी सांगितले की, यात बागलाणचे आठ ते दहा विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थी मायदेशी परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून मदतीची याचना करीत आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडीयाच्या आधारे व्हिडिओही पाठवला आहे. मायदेशी परतण्यासाठी भारत सरकारने मदत करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान यासंदर्भात गेल्या चार-पाच दिवसांत परदेशी अडकलेल्या विविध नागरीक व त्यांच्या भारतातील संबंधितांनी खासदार हेमंत गोडसे आणि खासदार डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी या खासदारांनी विदेश मंत्र्यांशी संपर्क ासधून त्यांना माहिती दिली आहे. सध्याच्या आणिबाणीच्या स्थितीत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरीक, विद्यार्थी यांची विमानसेवा बंद झाल्याने या त्यांची गैरसोय आहे. त्यांच्याकडून भारतात संपर्क केला जातो आहे. 'कोरोना'ची दहशत व उपाययोजनेमुळे विमानतळबंद केल्याने ही अडचण झाल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

आम्हाला आमच्या मुलांची खुप काळजी वाटते. आम्हाला आमचे मुले लवकर घरी आले पाहिजे हीच प्रशासनाकडून अपेक्षा आहे. यासंदर्भात भारत सरकारशी संपर्क केला आहे. त्यांच्याकडून काय व केव्हा मदत होते याची सर्वांना प्रतिक्षा आहे - डॉ. विलास भामरे, ताहाराबाद, बागलाण.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख